अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) आज 25 वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटी नंतर दोन्ही पक्ष एकाच दिवशी आपला वर्धापन दिन साजरा करत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्ष मुंबईत वर्धापनदिन साजरा करणार आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अहमदनगरमध्ये (Ahmednagar) वर्धापन दिन साजरा करणार आहे. अहमदनगरच्या न्यु आर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणात 25 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेत्यांसह पदाधिकारी अहमदनगरमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर (sakshana salgar) यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आणि केंद्रीय मंत्रिमंडळात (PM Modi Cabinet) स्थान न मिळाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला आहे.
टायगर अभी जिंदा है
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. तर महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली. राज्यात महायुतीत भाजपला 9, शिवसेना शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली. तर महाविकास आघाडीत काँग्रेसला 13, शिवसेना ठाकरे गट 9 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. शरद पवार गटाने एकूण 10 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 8 जागा जिंकल्या. तर अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीत केवळ चार जागा लढवल्या. त्यापैकी एकच जागा अजित पवार गटाला जिंकता आली. यावरून सक्षणा सलगर यांनी लोकसभा निवडणुकीतून हे स्पष्ट झालंय की टायगर अभी जिंदा है, असे म्हणत अजित पवारांना डिवचले आहे.
अजित पवार गटाचे राज्यातील अस्तित्व संपले
तर लोकसभा निवडणुकीत 293 जागा जिंकत बहुमत मिळवणाऱ्या एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहळ यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी स्थान मिळाले नाही, यावरून सक्षणा सलगर यांनी शपथविधीत अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे त्यांचे राज्यातील अस्तित्व संपले आहे, अशी टीका केली आहे.