Maharashtra Pune Pmc News: पुण्याच्या (Pune) आजूबाजुचे २३ गावे महानगरपालिकेत (Pmc) समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे पुणे महानगरपालिका राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका ठरली होती. मात्र आता याच २३ पैकी काही गावाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या 23 पैकी काही गावातील नागरिकांना मुलभूत सोयीसुविधांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्या सुविधा सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात आले होते. मात्र या सगळ्यांचा काही उपयोग न झाल्याचं चित्र आहे.
धायरी आणि ख़डकवासला परिसरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी वेळ सध्या या परिसरातील नागरिकांवर आल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यातील धायरी परिसरात बड्या इमारती आहेत. अनेकांना सुखसुविधा मिळेल या हेतूने नागरिकांनी या उपनगर असलेल्या भागात घरं खरेदी केली. मात्र आता काहीच दिवसात या सगळ्या नागिरकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पालिकेत समाविष्ट करण्याची घाई का केली?
या परिसरात काहीच वेळ पाणी येतं. त्याशिवाय काही विशिष्ठ वेळात टॅँकर येतात. घरातील पती-पत्नी कामावर गेल्यावर पाणी आलं तर त्याचा उपयोग काय? ग्रामपंचाय़त असताना आम्हाला निदान योग्य सुविधा मिळत होत्या आता मात्र रोज नव्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पालिकेत आमची गावं समाविष्ठ करण्याची घाई केली मात्र सोयीसुविधांचं काय?, असा संतप्त सवाल नागरिकांकडून पालिका प्रशासनाला विचारला जातोय.
क्षेत्रफळाने सर्वात मोठी महापालिका
23 गावे समाविष्ट झाल्यामुळे क्षेत्रफळाने महापालिकेची हद्द 485 चौरस किलोमीटर, तर महसूल विभागाच्या दाव्यानुसार महापालिकेची हद्द 516 चौरस किलोमीटर झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिकाआहे.
ही २३ गावे होणार समाविष्ट करण्यात आली आहे
म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी (बु.), नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.