Shivsena : शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी रात्री या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. 


शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यावर मजबूत पकड आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची सूत्रे आली होती. ठाणे महापालिकेत मागील काही दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यातील 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेला पु्न्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याआधी ठाण्याचे महापौर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता नगरसेवकही शिंदे गटाकडे वळल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. 


ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे 34, भाजपकडे 23, काँग्रेसकडे 3 आणि एमआयएमकडे 2 नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. 


खासदार राजन विचारे शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद 


ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची शिवसेना लोकसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी ही घोषणा करण्यात आली होती. याआधी भावना गवळी या शिवसेनेच्या प्रतोद होत्या. मात्र, त्यांनी एकनाथ शिंदे यांना अनुकूल भूमिका घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर राजन विचारेंची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


'तुम्ही नेमके का गेलात, ते एकदाचे ठरवा, गोंधळू नका!'; संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला