मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तापेच उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला. तसंच बहुमत चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची गरज नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. आज (26 नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता कोर्टाच्या  कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत न्यायालयाने हा आदेश दिला.


सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर फडणवीस सरकारकडे आता केवळ दीड दिवस शिल्लक आहे. तर या निर्णयामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. आज संविधान दिनाच्या दिवशी संविधानाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तर बहुमताचा ठराव आम्हीच जिंकू, अशा विश्वास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीची याचिका
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे बहुमत नसूनही त्यांना सरकार स्थापन केलं. त्यांच्या सरकारला ताबडतोब विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एन व्ही रमणा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या विशेष खंडपीठासमोर रविवारी आणि सोमवारी दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 27 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे.

सुप्रीम कोर्टात आज काय झालं?
न्यायालय आणि विधीमंडळ यांच्या अधिकारावरील वाद खूप जुना आहे. हा वाद सोडवण्याची आवश्यकता आहे. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. नागरिकांना चांगलं सरकार मिळावं हा त्यांचा अधिकार आहे. या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यावरही विचार आवश्यक आहे. आम्ही उत्तराखंडचं प्रकरण, एस आर बोम्मई प्रकरण, जगदंबिका पाल या सर्व प्रकरणांचा अभ्यास केला. आमदारांचा शपथविधी अद्याप झालेला नाही. घोडेबाजार रोखण्यासाठी अंतरिम आदेशाची गरज आहे. त्यामुळे 27 नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी व्हावी. यासाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करा. पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण व्हावा. त्यानंतर तातडीने विधीमंडळाच्या पटलावर बहुमत चाचणी व्हावी. बुहमत चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही, लाईव्ह टेलिकास्ट करा. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची गरज नाही. असं सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्यमेव जयते', एवढंच त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.