Shivsena Symbol: शिंदे गटाने पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना हे मुख्य नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पर्यायी नावांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत ठाकरे आणि शिंदे गटाला दिली होती.


निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन  पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे. त्यामुळे  शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले आहे. आता, निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


चिन्हांसाठी कट-कटशह


ठाकरे आणि शिंदे गटात डाव-प्रतिडाव रचला जात आहे. ठाकरे गटाने पर्यायी तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय दिला आहे. तर, शिंदे गटानेदेखील उगवता सूर्य आणि त्रिशुळ या चिन्हांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटाने 'गदा' या चिन्हाचा तिसरा पर्याय दिला आहे.


ठाकरे गटांकडून तीन चिन्हांचा पर्याय


शिवसेना ठाकरे गटांकडून निवडणूक आयोगाला तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय देण्यात आला. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. तर, पक्षाच्या नावांसाठी शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पर्याय देण्यात आले आहेत.


ठाकरे गटाकडून दिल्ली हायकोर्टात याचिका


शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याच्या आदेशाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाने कागदपत्रे मागितली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंची कागदपत्रे तपासल्यानंतर  शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. त्याशिवाय, शिवसेना हे मूळ नाव वापरण्यासही मनाई केली आहे. निवडणूक आयोगाने योग्य प्रकारे सुनावणी केली नसल्याचा दावा करत ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली आहे.