Maharashtra Politics  Shivsena : विधानसभेत शिंदे गट आणि भाजप सरकारची बहुमत चाचणी होण्याआधीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर संतोष बांगर हे भावनिक भाषण केले होते. त्याशिवाय, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही घेतली होती. आता बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. बांगर हे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आहेत. शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या 40 वर गेली आहे. 


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच बंड केल्यानंतर काही मोजकेच आमदार शिवसेनेसोबत कायम राहिले होते. यामध्ये बांगर यांचाही समावेश होता. संतोष बांगर यांनी बंडखोरीविरोधात भूमिका घेतल्याने शिवसैनिकांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. त्यांच्या नेतृत्वात मोठे मोर्चेही झाले होते. मात्र, आज बहुमत चाचणीआधीच बांगर यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला.


बंडखोरांविरोधात बांगर यांचे वादग्रस्त वक्तव्य


ज्यांनी शिवसेनेसोबत बेइमानी केली त्यांच्यावर त्यांचा बायकासुद्धा भरोसा करणार नाही इतकेच काय तर त्यांची मुलं सुद्धा अविवाहित ( मुंजे) मरणार आहेत असे वादग्रस्त विधान शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केले होते. संतोष बांगर मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिल्याने जिल्हाभरात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानिमित्त वसमत शहरात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा बोलताना आमदार बांगर यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. 


जेव्हा बांगर भाषणात ढसाढसा रडले


मागील 24 जून रोजी हिंगोलीमध्ये शिवसेनेच्यावतीने बंडखोरांविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बंडखोरीविरोधात भूमिका घेतल्याने बांगर यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी भाषण करताना संतोष बांगर ढसाढसा रडले होते. तुम्ही पुन्हा पक्षात या, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील असे आवाहन त्यांनी केले होते. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माझी एवढी मोठी मिरवणूक काढली नव्हती, ती आज काढण्यात आली. शिवसैनिक कायम उद्धव यांच्या पाठिशी असणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. या भाषणाची जोरदार चर्चा झाली होती. 


पाहा व्हिडिओ: शिवसेना आमदार ढसाढसा रडला