Maharashtra Rain : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेतकरी संध्या पावसाची वाट बघत आहे. सध्या मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडताना दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं तेथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये काही भागात जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे.


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. तरी औरंगाबाद जिल्ह्यात 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणी सुद्धा केली आहे. पण अपेक्षाप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुबारपेरणीच संकट बळीराजावर ओढवला आहे. 


विदर्भात काय स्थिती


दरम्यान, नेहमीप्रमाणे यंदाही भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाचा अंदाजापेक्षा एकदम उटल परिस्थिती निर्माण झाली. जून महिन्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून लवकर दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची स्थिती आहे.


शेतकऱ्यांच्या सर्व आशा आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांवर आहेत. या महिन्यांत समाधानकारक पाऊस पडला तरच चांगले पीक होणार आहे. 16 जूनला मॉन्सून दाखल झाल्यापासून नागपुरात केवळ एकच दिवस (23 जूनला)  60 मिलिमीटर पाऊस बरसला. त्यानंतर वरुणराजाने केवळ नावापुरतीच अधूनमधून हजेरी लावली. उशिरा आलेल्या व पुरेशा पावसाअभावी सध्या पेरण्या खोळंबल्या असून, अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय हवामान विभागाने यंदा 103 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तो अंदाज आतापर्यंत तरी खोटा ठरला आहे.


सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी वाट बघत आहेत. संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. अशातच संपुर्ण जुलै महिन्यात मान्सून देशात सरासरी इतका अपेक्षित आहे. परंतू, महाराष्ट्रात मात्र तो सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता 45 टक्के जाणवत असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे.