Maharashtra Politics : व्हिप झुगारून 39 आमदारांनी केलेले मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली केली असल्याचा घणाघात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील बंडाळी आणखी ठळकपणे दिसून आली. शिवसेनेच्या 39 बंडखोरांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात मतदान केले. शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हिप झुगारून मतदान केले. त्यामुळे आपण (राहुल नार्वेकर) विधानसभेच्या अध्यक्षपदी किती काळ असाल याबाबत राज्यातील 13 कोटी जनतेला शंका आहे, असेही सुनील प्रभू यांनी म्हटले. 


आज विधानसभा अध्यक्षपदाची निवड पार पडली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. त्यानंतर नवनिवार्चित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटले की, विधानसभेच्या अध्यक्षपदी तरुण सदस्याची निवड झाली याचा आनंद वाटत आहे. आपण कधीकाळी शिवसेनेत नंतर राष्ट्रवादी गेलात. त्यानंतर भाजपात गेलात. मागील 15 दिवसांमध्ये सत्तांतराच्या वातावरणात राहुल नार्वेकर कायदा मंत्री होतील असे वाटलं होतं. नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. ज्यांना मुख्यमंत्री पाहत होतो त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. ज्यांना कायदा मंत्री म्हणून पाहत होतो त्यांना विधानसभा अध्यक्ष व्हावे लागले असे प्रभू यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असतील असे वाटलं होतं. मात्र, आमचं दु:ख विसरून देवेंद्र यांचं दु:ख मित्र म्हणून मोठं वाटलं असल्याचेही प्रभू यांनी म्हटले.  


विधानसभेच्या अध्यक्षाबाबत महाराष्ट्रातील जनतेला, विधानसभा सदस्यांना आदर वाटत आहे. मात्र, आजच्या मतदानात आमचा व्हिप झुगारून 39 जणांनी मतदान केले. ही खंत वाटत आहे. राज्यातील 13 कोटी लोकांना याची खंत वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. आता, 39 आमदारांनी व्हिप झुगारून मतदान केले. त्यामुळे आपण विधानसभेच्या अध्यक्षपदी किती काळ असाल याबाबत राज्यातील 13 कोटी जनतेला शंका असल्याचेही प्रभू यांनी म्हटले. 


व्हिपवरून वाद सुरूच 


विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झरवळ यांना पत्र लिहीले. या पत्रात प्रभू यांनी, पक्षाच्या आदेशाविरोधात 39 आमदारांनी मतदान केले असून त्याची नोंद घ्यावी अशी विनंती केली. उपाध्यक्षांनी हे पत्र रेकॉर्डवर आणले. तर, दुसऱ्या बाजूला विधानसभेचे नवीन अध्यक्ष राहुल नावर्केर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरील भाषणानंतर एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. गोगावले यांनी पक्षाच्या 16 आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केले असल्याचे पत्रात म्हटले. या पत्राची विधानसभा अध्यक्षांकडून नोंद घेण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी शिवसेना विधीमंडळ पक्षाचे प्रतोद भरत गोगावले असा उल्लेख केला.