Aarey Metro Car Shed Project : आम्हाला धोका दिला पण मुंबईला धोका देऊ नका असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारला केले आहे. आरेचे जंगल मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आरेच्या जंगलाचा प्रश्न नसून त्याठिकाणी असलेल्या जैवविविधतेचाही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. 


राज्यात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुंबईतील आरेमध्ये पुन्हा एकदा मेट्रोचे कारशेड स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे. नव्या सरकारने घेतलेल्या या पहिल्याच निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग, गोरेगाव पहाडी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेच्या पर्यायावर विचार सुरू होता. या नव्या सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईवर घाला घालणारा असल्याचे त्यांनी म्हटले. आमचा राग मुंबईवर काढू नका असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आरेचा मुद्दा हा फक्त जंगलाचा नाही तर जैवविविधतेचा आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले. 


आरेमध्ये आज आंदोलन


आज आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी सर्व पर्यावरणवादी आणि संघटनांना जमण्याचं आवाहन केलं आहे. आरे वनक्षेत्रात पर्यावरणवादी संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे. पर्यावरणवाद्यांनी शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आदित्य ठाकरे यांच्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनीदेखील आरेतील मेट्रो कारशेडला विरोध दर्शवला आहे.  आरेतील कारशेडबाबत सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. 


शिंदे सरकारनं सत्तेची सूत्रे हाती घेताच 'आरे'मध्येच मेट्रो कार शेड होणार असल्याचं राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांना कळवलं आहे. आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत.   मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. यावरुन मोठा गदारोळ देखील झाला होता. आरेमधील मेट्रो शेड विरोधात नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता. कांजूरमार्गमधील कारशेडच्या प्रस्तावित जागेचा वाद सध्या हायकोर्टात आहे.