मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. गुवाहटीतून एबीपी माझाशी बोलताना संदीपाने भुमरे (Sandipan Bhumre) म्हणाले, एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे, ते सांगतील तसंच घडेल, आता आमचं तेच नेतृत्व असेल.


शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. कालपासून बंडाच्या पवित्र्यात सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला रवाना झाले. यामध्ये एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, बच्चू कडू, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांचयासह 6 मंत्री आहेत.


संदीपान भुमरे नेमकं काय म्हणाले? 


आम्ही आता 35 ते 36 जण सोबत आहोत. सगळे एकत्र आहोत. विशेषत: शिंदेसाहेबांच्या नेतृत्त्वात एकत्र आहोत. ते सांगतील तसं करु. उद्धवसाहेबांचं आणि शिंदेसाहेबांचं काय बोलणं झालं ते आम्हाला माहिती नाही. पण शिंदेसाहेब जे सांगतील, जो आदेश देतील तसं करु. मला फोन केलेला होता, पण मी सांगितलं शिंदेसाहेबांसोबत आहे असं सांगितलं. मला खैरे साहेबांनी फोन केला होता. आम्ही स्पष्ट सांगितलं जिल्ह्यातील ६ पैकी ५ जण त्यांच्यासोबत आहोत. 
आमचं म्हणणं आहे की मतदारसंघातील कामं व्हावी, निधी मिळावी यासाठी सर्वांची नाराजी आहे.


आता आम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृ्त्व मान्य केलं आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. शिंदेसाहेबांसह 6 मंत्री आहेत. आम्ही पक्ष बदलणार नाही. शिंदेंसोबत राहणार. बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत. एकनाथ शिंदेंसोबत राहणार. आम्ही शिवसेनेत राहणार, पण वेगळा गट राहणार, असं भुमरे म्हणाले.


उद्धव ठाकरेंनी सर्व दिलं, तरीही नाराजी का? 


मला वैयक्तिक काही नाही, मी काही मागितलं नाही. फक्त कामं झाली पाहिजे हा हेतू होता. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कामं करताना अडचणी येतात. आम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. तो माणूस असा आहे, सर्व कामं करतो. 


उद्धव ठाकरे म्हणाले तर सातव्या माळ्यावरुन उडी मारु असं म्हणालो होतो, पण सत्ता आली तरी कामं होतं नव्हती, मी वारंवार सांगत होतो उद्धव साहेबांना. मला कॅबिनेट मंत्रिपद आहे, त्यापेक्षा मोठं मला काय हवं.. पदासाठी मी गेलो नाही.


४० आमदार एकत्र आले त्याला काहीतरी कारण असेल ना. सत्ता असताना एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदार आले म्हणजे कारण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्रास होतो हे उद्धव साहेबांना सांगितलं आहे. 


एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो 


एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. 


VIDEO :  संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया 



 


संबंधित बातम्या 


शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत; आमदारांसह गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा दावा