Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे नुकतेच यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यावेळेस त्यांनी मोदी सरकारवर त्यांच्या कामावरून जोरदार टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या या टीकेला आज भाजपचे विधान परिषद गट नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर उत्तर दिले.


उद्धव ठाकरे यांना शेतातील काहीही समजत नाही. त्यांचा आणि शेतीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना शेतीविषयी प्रश्न विचारायचा कुठलाही अधिकार नाही. अडीच वर्ष राज्यात उद्धव ठाकरे यांची सत्ता असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कळवळा त्यांना आला नाही. मात्र, आता उद्धव ठाकरे शेतीवरती बोलत आहे. ते जर खरंच शेतकरी असतील तर त्यांनी शेतात काय लागतं हे व्यासपीठावर येऊन त्यांनी सांगावं, असे खुले आव्हान प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. सोबतच एका दिवसात चार सभा घेतल्याने उध्दव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका देखील दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.  


उद्धव ठाकरे भयभीत झालेय 


पंतप्रधान मोदी हे जुमला आहे की गॅरंटी, हे देशातील जनतेला चांगल्याने माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभेत काही प्रश्न विचारले. ज्यामध्ये घरांचा काय झालं, उज्वला गॅसचे काय झालं, शेतीचं काय झाले. याबाबत बोलतांना उद्धव ठाकरे यांनी थोडा अभ्यास करावा. नुसत्या शिव्यांची लाखोली वाहण्यापेक्षा या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात जेवढा विकास झाला तो गेल्या 40 वर्षांत झालेला नाही. ज्या पद्धतीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावलंय, आपण आर्थिक महासत्ता बनायला चाललोय आणि समाजाच्या सर्वांगीण विकास करत इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शेती व्यवसाय असेल सगळीकडे डेव्हलपमेंट दिसते आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आज भयभीत झाले असावे. म्हणूनच त्यातूनच ते अशा प्रकारच्या टीका करत असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. 


पवारांनी जे पेरलं तेच आता उगवले


यावेळी बोलतांना आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पावर यांच्यावर देखील टीका केली आहे. शरद पवारांनी जे पेरलं तेच आता उगवले आहे. त्यांनी दुसऱ्यांची घरं फोडली तेव्हा काय वाटलं नाही. मात्र, आज त्यांना आपल्याच घरातील एक कर्तबगार माणूस वेगळा झाल्यामुळे हे कष्ट सोसावे लागत असल्याचे दरेकर म्हणाले. गेल्या काही दिवसापासून आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सामील होण्याची चर्चा आहे. शिवाय आज निलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतली असून ते लवकरच पक्षप्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर भाष्य करतांना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, मला असे वाटतं काही लोकांचा अंतिम श्वास हा त्यांची उमेदवारी हा आहे.


कदाचित निलेश लंके यांना खासदारकीची निवडणूक लढवायची असेल. समजा ते अजित पवार यांच्या बरोबर त्याठिकाणी राहिले तर आमचा तिथला उमेदवार सुजय विखे ठरला असल्याने त्यांना तिथे संधि मिळणार नाही. त्यामुळे कदाचित ते शरद पवार यांच्याकडे जात आहेत तर त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळत असल्याचा देखील प्रवीण दरेकर म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या