Balasaheb Thorat vs Nana patole : काँग्रेसमधील अंतर्गत कलह सध्या विकोपाला गेल्याचं समोर आले आहे. नाना पटोले यांची हायकमांडकडे तक्रार केल्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय. थोरातांना आपला राजीनामा हायकमांडकडे का पाठवावा लागला? यामागे नेमकी कारणं काय आहेत? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. 


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा पूर्ण केली. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. 'नफरत छोडो ....भारत जोडो' ही घोषणा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत दिली होती. 'नफरत छोडो ....भारत जोडो' ही घोषणा कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत सर्वांनाच ऐकायला मिळाली. भाजपला उद्देशून ही घोषणा देत असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कमालीची नफरत वाढताना पाहायला मिळते. महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोलापाला गेलाय. 


बाळासाहेब थोरात हे राज्यातील काँग्रेसचं एक मोठं नाव आहे. ते महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी महसूल मंत्री आणि सध्याच्या विधिमंडळीतील सर्वात वरिष्ठ सदस्य आहेत.  जवळपास 40 वर्ष काँग्रेसच्या संगमनेरच्या बालेकिल्ल्याचे किल्लेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. ते सध्या काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आहेत. मात्र आपण वरिष्ठ असूनही आपला मान राखला जात नाही, असं सांगत थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदाचा राजीनामा आपल्या हायकमांकडे सुपूर्द केलाय... त्यातून पुन्हा एकदा काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.  


प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा वाद सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून खऱ्या अर्थाने अधिक वाढला. सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक आहेत. पक्षाच्या विरोधात काम केल्याने प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले  यांनी सत्यजित तांबे आणि सुधीर  तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. एवढंच नाही तर नगरमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तांबेना मदत केली. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. एवढी मोठी कारवाई थोरातांसाठी धक्कादायक होती. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या जिल्ह्यात कारवाई करत असताना त्यांना विचारात घेणं अपेक्षित होतं. मात्र कोणतीच चर्चा न करता ही कारवाई केल्याने थोरात यांचा नाना पटोले यांच्यावरील रोष अधिकच वाढला. हे सर्व प्रकरण घडत असताना थोरातांनी ही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली. थोरात जरी रुग्णालयात उपचार घेत होते, तरी साधं पत्र काढून आपली भूमिका स्पष्ट करू शकले असते.  अजित पवारांनी भूमिका घेतल्यानंतर शरद पवारांसारखी भूमिका घेऊन सत्यजीत तांबे आणि काँग्रेसमधील दुरावा कमी करू शकले असते. त्यात थोरात यांची भूमिका कुठेच पाहायला मिळाली नाही. हा सस्पेन्स कायम राहिला.


विधान परिषदेच्या नागपूर जागेवरती सुधाकर अडबाले  यांना पाठिंबा द्यावा, अशी स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांची मागणी होती. मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले भूमिका घेत नसल्याने त्यांच्याविरोधात जाऊन स्थानिक नेत्यांनी त्यांची घोषणा केली आणि नंतर नाना पटोले  यांना पाठिंबा द्यावा लागला. त्यामुळे नाना पटोले यांच्याबद्दल नागपूरच्या नेत्यांमध्ये कुठंतरी नाराजी निर्माण झालेली होती. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर विदर्भातील काही नेत्यांनीसुद्धा तोच सुर पकडत नाना पटोले यांच्या विरोधात भूमिका घेतली. 


नाना पटोले यांच्याबद्दलची ही नाराजी या निवडणुकीत नाही, तर ज्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्या दिवसापासून काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले असा पक्षांतर्गत संघर्ष उभा राहिला होता. महाविकास आघाडीसाठी हे पद मोठ्या मेहनतीने मिळवलेलं असताना नाना पटोले यांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची होती. त्यामुळे त्याच ठिकाणाहून नाना पटोले विरुद्ध अनेक काँग्रेसचे नेते असा हा अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत होता. हा संघर्ष आता अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय. राज्यात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण असे दोन गट पाहायला मिळतात. दोन्ही गटांच्या पडद्यामागून अनेक हालचाली सुरू असतात. त्याचाच एक भाग हा असावा अशी ही राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे. 


या सर्व प्रकरणावरून आता काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्याबद्दलही नाराजी वाढू लागली. एचके पाटील प्रभारी आहेत आणि राज्यामध्ये जर दोन मोठ्या नेत्यांमध्ये एवढी दरी  वाढत असेल तर एचके पाटील यांनी मध्यस्थी करण अपेक्षित आहे. मात्र ते यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेत. म्हणून त्यांचीही हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचा सूर काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत एचके पाटील उपस्थित राहणार का हाही मोठा प्रश्न आहे. 


बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला असा राजीनामा द्यावा लागणं, हे दुर्दैव आहे. जर काँग्रेसचे कोणी नेते भाजपमध्ये येऊ पाहत असतील तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. त्यांना आम्ही मानसन्मान देऊ अशी खुली ऑफर भाजपने द्यायला सुरुवात केली आहे. 15 फेब्रुवारीला मुंबईत काँग्रेसची होणारी ही बैठक या सगळ्या प्रकरणावरून वादळी ठरणार तर आहेच. मात्र नाना पटोले यांच्याबद्द्ल वाढती नाराजी आणि बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा आणि सत्यजित तांबे प्रकरण या सगळ्यावरून हायकमांड काय निर्णय घेणार? यावरती काही कारवाई करणार की नेत्यांची समजूत काढून हे प्रकरण जैसे थे ठेवणार हे पाहणं महत्वाचं राहील.