Maharashtra Politics News: मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी विरोध केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत असताना आता मनसेच्या एका जेष्ठ नेत्यांकडून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आमचा राष्ट्रवादीने वापर करून घेतला असल्याचा दावा मनसेचे जेष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) यांची मुलाखत घेतल्याचे फोटो राष्ट्रवादीकडून पोस्ट केले जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना महाजन म्हणाले की, राज ठाकरेंनी ती मुलाखत काही लपुन छपुन घेतली नव्हती. त्या मुलाखतीनंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आम्हाला वापरून घेतल्यावर जो काही अनुभव आला त्यांनतर आम्ही शरद पवारांपासून चार हात दूर राहणे पसंद केल्याचं प्रकाश महाजन म्हणाले. तर वेळेपुरता वापर करणे हे शरद पवारांची जुनी पद्धत असल्याचं प्रकाश महाजन यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध करण्यामागे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा हात असल्याचं मी आधीच म्हटलं होतं. तर भोंग्याच्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला माघार घ्यावी लागली. आमच्या आंदोलनामुळे आणि राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे सकाळची आजान बंद झाली. त्यामुळे याची कुठेतरी सल दोन्ही पक्षाच्या मनात आहे. त्यादरम्यान आमच्या अयोध्या दौऱ्याचा मोठा शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर पवारांचे संबंधित असलेले भाजपचे खासदार बृजभूषण सिंह त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनतर त्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला असल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.
'लाव रे तो व्हिडिओ' राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून?
प्रकाश महाजन यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कारण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत अनेक सभा गाजवल्या होत्या. विशेष म्हणजे या सभांमधून राज यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.फडणवीसांपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत राज यांनी आपल्या निशाण्यावर घेतले होते. पण यासर्व मागे राष्ट्रवादीचा हात होता अशी चर्चा आता प्रकाश महाजन यांनी केलेल्या दाव्यानंतर होऊ लागली आहे.
मनसे-राष्ट्रवादीत फोटोवॉर!
अयोध्याच्या दौऱ्यात होणारा विरोध हा एक ट्रॅप होता आणि त्याची सूत्रे महाराष्ट्र्रातुन हलवली गेल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत केला. त्यांनतर मनसेकडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो व्हायरल करायला सुरवात केली. तर राष्ट्रवादीकडून सुद्धा शरद पवार यांची राज ठाकरेंनी मुलाखत घेतल्याला कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले जात आहे. त्यांनतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.