Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार निश्चित झाला असून, कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी मिळाली आहे. तर लवकरच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे याना दुसऱ्यांदा डावलण्यात आले आहे. सलग चारवेळा खासदार राहिलेल्या खैरेंना गेल्यावेळी सुद्धा राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारी देताना डावलण्यात आले होते. त्यांनतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा संधी हुकलण्याने खैरे काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


कोण आहेत खैरे... 


लोकसभा निवडणुकीत विजयाचे चौकार लगावणारे खैरे 1999 ते 2014 या कालावधीत सलग चारवेळा खासदार राहिले आहेत. 1999 च्या निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांचा त्यांनी पराभव करून पहिल्यांदा लोकसभेत पाऊल ठेवलं. त्यांनतर 2004 च्या निवडणुकीत त्यांनी माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विजय मिळवला. तर 2009 च्या निवडणुकीत माजी खासदार उत्तमसिंह पवार आणि इतर उमेदवारांवर त्यांनी मात केली. पुढे 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा घेत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार नितीन पाटील यांचा विक्रमी मतांनी पराभव केला.मात्र २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण त्यांनतर सुद्धा अनेकदा त्यांनी आपण लोकांच्या मनातील खासदार असल्याचं म्हटलं होते. विशेष म्हणजे आजही त्यांच्या गाडीवर खासदार असताना लावण्यात आलेला 'एमपी' हे स्टिकर जशाच्या तसेच आहे.त्यामुळे पाचव्यांदा खासदार होण्याचे त्यांचे स्वप्न पाहत असताना पुन्हा एकदा त्यांना डावलण्यात आले आहे. 


चतुर्वेदी यांना संधी मिळाल्याने होते नाराज... 


गेल्यावेळी सुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी प्रियंका चतुर्वेदी यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे खैरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मला नाही, मात्र, माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मला अनेक ऑफर होत्या पण शिवसेना सोडली नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला होता. आता ती बाई खूप चांगलं काम करेल. हिंदी बोलते इंग्रजी बोलते हरकत नाही. पण, मी वीस वर्षे लोक सभा गाजवली. मी इकडे तिकडे कधी गेलो नाही. मला अनेक ऑफर होत्या. मरेपर्यंत शिवसैनिक राहील. बाकीचे येतात आणि जातात. कितीजण कितीजण गेले. लोकांच्या सेवेसाठी आघाडीसोबत गेले, अशी खदखद खैरे यांनी व्यक्त केली होती. 


पराभवापेक्षा मी मेलो का नाही!


सलग चारवेळा खासदार राहिलेल्या खैरेंना गेल्यावेळी पराभव स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे त्यांचा पराभव एमआयएम पक्षाकडून झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभव त्यांना चांगलाच जिव्हारी लागला होता. तर हा पराभव पाहण्याआधीच मी मेलो का नाही, अशा अत्यंत तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होता. शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते भावुक झाले होते.