Ajit Pawar On Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकारकडून पोलिसांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप करत सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आव्हाड यांनी राजीनामा न देण्याचे आवाहनही पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत भाष्य केले. जितेंद्र आव्हाड यांनी 72 तासात दोन गुन्हे दाखल झाल्याने कंटाळून राजीनामा देतो असे म्हटले. जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा विनंती आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी केले. ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या शरद पवारांनी अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक स्थित्यंतर पाहिलीत. हे लक्षात घेता आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये असे अजित पवार यांनी म्हटले.
समोर आलेल्या व्हिडिओनुसार, जितेंद्र आव्हाड हे अनेकांना हाताने बाजूला करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी या महिलेला बाजुला केले. बाकी काही घडलेले नाही. मुख्यमंत्र्यांची कार काही फूट अंतरावरच होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढं येऊन विनयभंगाचा प्रकार घडला नसल्याचे सांगायला पाहिजे. तुम्ही कशाही प्रकारे मुख्यमंत्री झाला असलात तरी तुम्ही महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात, असेही पवार यांनी म्हटले.
महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. आव्हाडांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे हा भ्याडपणा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष देण्याची गरज आहे. कोणतेही कारण नसताना जर लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे, अपमानित करण्याचे काम होत असेल तर जनतेने याची दखल घ्यायला हवी असे आवाहनही पवार यांनी केले. जितेंद्र आव्हाडांवरील हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.
राज्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला बगल देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अशा घटना समोर आणल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. विवियाना मॉल प्रकरणातील प्रेक्षकाने आव्हाड यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. तरीदेखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आला नाही. दिवस बदलतात. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात असे सांगताना अजित पवार यांनी नियमांचे, कायद्याचे पालन होत नसेल तर कोणत्याही पक्षाचा आमदार का असेना कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: