CM Eknath Shinde :आज सकाळी विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेसाठी ठसाठसा रडणारे आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामिल झाले. संतोष बांगर हे आपल्याकडे आले याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च किस्सा सांगितला. रात्री 1.30 वाजता संतोष बांगर आमच्याकडे आले. शिवसेनेतून आणखी काही आमदार येणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. 


विधानसभेत शिंदे गट आणि भाजप यांनी बहुमत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात चौफेर टोलेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 वे आमदार आपल्याकडे कसे आले, याचा किस्सा सांगितला. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास संतोष बांगर यांनी फोन केला. आपली चूक झाली असून मला तिथं यायचं आहे, असेही बांगर यांनी सांगितले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर बांगर हे आमच्याकडे आले. आणखी काही आमदारांनाही माझ्यासारखे वाटत असल्याचे बांगर यांनी सांगितले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 


शिवसेनेत बंड झाल्यानंतर संतोष बांगर हे भावनिक भाषण केले होते. त्याशिवाय, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही घेतली होती. आता बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. बांगर हे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आहेत. शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या 40 वर गेली आहे. 


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच बंड केल्यानंतर काही मोजकेच आमदार शिवसेनेसोबत कायम राहिले होते. यामध्ये बांगर यांचाही समावेश होता. संतोष बांगर यांनी बंडखोरीविरोधात भूमिका घेतल्याने शिवसैनिकांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. त्यांच्या नेतृत्वात मोठे मोर्चेही झाले होते. मात्र, आज बहुमत चाचणीआधीच बांगर यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला.


बंडखोरांविरोधात बांगर यांचे वादग्रस्त वक्तव्य


ज्यांनी शिवसेनेसोबत बेइमानी केली त्यांच्यावर त्यांचा बायकासुद्धा भरोसा करणार नाही इतकेच काय तर त्यांची मुलं सुद्धा अविवाहित ( मुंजे) मरणार आहेत असे वादग्रस्त विधान शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केले होते. संतोष बांगर मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिल्याने जिल्हाभरात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानिमित्त वसमत शहरात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा बोलताना आमदार बांगर यांनी हे वादग्रस्त विधान केले होते.