Maharashtra Politics: राज्यात महाविकास आघाडी म्हणून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकमत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकमध्ये आज मविआची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत आगामी काळातील वाटचालीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, भाजपचा कर्नाटकमध्ये मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत चर्चा करण्यात आली. या निकालानंतर त्यापुढील वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. उन्हाळा कमी झाल्यानंतर पाऊसमान पाहून सभा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मविआची वज्रमूठ सभा सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
विधानसभा-लोकसभा एकत्रितपणे लढवणार
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. या निवडणुकीतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांचे नेते चर्चा करणार आहेत अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. कर्नाटक प्रमाणे मविआला महाराष्ट्रात यश मिळेल असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, कर्नाटकच्या जनतेमध्ये भाजप विरोधात रोष होता तो मतपेटीतून व्यक्त झाला आहे. कर्नाटकमधील जनतेने मोदी-शाह यांच्यावरचा राग काढला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. पुढील सभा पुण्यात होणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार पुण्यातील सभेत करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले की, मविआत कोणतेही मतभेद नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे नव्हे तर देशातील विरोधी पक्ष जिंकला आहे. महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव होणार आहे. जसं कर्नाटकात जिंकलो...त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे. मविआमध्ये जागा वाटप होणार. त्याची चिंता इतरांनी करू नये, असेही राऊत यांनी म्हटले.