Supriya Sule : छत्रपती संभाजी महाराजांवरील (Chhatrapati Sambhaji Maharaj) महानाट्याचे मोफत तिकीट (Free tickets ) दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी (Mp Amol kolhe) पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri-Chinchwad Police) दलातील काही पोलिसांवर केला आहे. कोल्हेंच्या आरोपानंतर आता अनेक स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी असल्याचे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत ही नाराजी व्यक्त केली आहे.
ट्विटमध्ये काय लिहिलंय?
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत अतिशय प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न खासदार डॉ अमोल कोल्हे करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगांना राज्यातील शिवप्रेमी जनता उदंड प्रतिसाद देत असताना पिंपरी चिंचवड येथील प्रयोगाच्या दरम्यान या महानाट्याच्या फुकट प्रवेशिकेसाठी येथील पोलिसांनी धमक्या दिल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना आहे. खासदार असणाऱ्या डॉ कोल्हे यांना अशा पद्धतीने धमकी दिली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे. खासदारांना पोलीस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची तातडीने याची दखल घेऊन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
अमोल कोल्हेंनी कोणते आरोप केले?
पिंपरी-चिंचवड शहरातील एचए मैदानावर 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचं सादरीकरण सुरु आहे. या महानाट्याचा मोफत पास मिळावा म्हणून पिंपरी पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे. नाटकाचे पास दिले नाही तर सादरीकरण कसं होतं ते बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याची माहिती देत अमोल कोल्हे यांनी खंत व्यक्त केली आहे. वर्दी ही जबाबदारीची असते याची जाणीव ठेवावी, असं डॉ. अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितलं. अद्याप फ्री पास मागितलेल्या त्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचं नाव समोर आलेलं नाही. परंतु या प्रकारामुळे पोलिसाची मान निश्चितच झुकल्याचं बोललं जात आहे.