Amol Mitkari अकोला: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या सगळ्यात आता नेमका कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, हे अंतिम यादी जाहीर झाल्यावरच त्याबाबतचा शिक्कामोर्तब होणार आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यातील लोकसभेच्या 11 मतदारसंघात आपली ताकद असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या 11 जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी अमित शाहांकडे (Amit Shah) केली असल्याचे देखील ते म्हणाले आहे.
या 11 जागामध्ये बारामती, सातारा, रायगड, माढा, परभणी, गडचिरोली, बुलढाणा, दिंडोरी, शिरूर, धाराशिव आणि माढा या जागांचा समावेश असल्याचं मिटकरी म्हणालेय. त्यामूळे भाजपा आणि राष्ट्रवादीत जागावाटपावरून आणखी रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड, डॉ. अमोल कोल्हे, रोहीत पवारांची भाजपसोबत जाण्यासाठीची शपथपत्र आमच्याकडे असल्याचा दावा पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे.
आमच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब?
महायुतीतील जागा वाटपासंदर्भात दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. आम्हाला नक्कीच सन्मानजनक जागा मिळतील. असा विश्वास अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने 11 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय, त्या ठिकाणी आमची मोठी ताकद असल्याने या 11 जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी आम्ही अमित शाहांकडे केली असल्याचे देखील ते म्हणाले. या संबंधित प्रस्ताव आमचा महायुतीकडे असून यावर अमित शाहा लवकरच शिक्कामोर्तब करतील. सोबतच आचारसंहितापूर्वी महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय लागलेला असेल, असे देखील अमोल मिटकरी म्हणाले.
शिरूरसाठी दादा जो उमेदवार देतील तोच अंतिम
येत्या काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहे. निवडणुकांपूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव (Shivaji Adhalrao) इच्छुक असल्याची जोरदार चर्चा असताना आज त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या दिलीप मोहितेंची आढळरावांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आपापसातील वैर संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आढळरावांच्या भेटीनंतर दिलीप मोहितेंचा नाराजीचा सूर अद्याप कायम आहे. याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, शिरूरसाठी बरेच लोक आमच्या संपर्कात आहे. ज्यामध्ये विलास लांडे, आढ़ळराव पाटील आणि नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा आहे. असे असले तरी, आजितदादा जो उमेदवार शिरूरसाठी देतील तोच उमेदवार अंतिम असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
आणखी वाचा