मुंबई: दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव केला होता तेव्हा भास्कर जाधव हे शिंदे गटात येणार होते. परंतु, त्यावेळी भाजपने विरोध केल्यामुळे इच्छा असूनही भास्कर जाधव यांना अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरावे लागले, असा खळबळजनक गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भास्कर जाधव यांच्याविषयी अनेक सनसनाटी दावे केले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उठाव केला तेव्हा शिवसेनेचे अनेक आमदार सुरतमध्ये गेले होते. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे गुजरातच्या सीमेपर्यंत येऊन माघारी फिरले होते. भास्कर जाधव हे सुरतच्या जवळ पोहोचले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना सांगण्यात आले की, तुम्हाला आमच्यासोबत घेता येणार नाही. भाजपकडून तुम्हाला आमच्या गटात घेण्यास विरोध केला जात आहे. भास्कर जाधव यांनी मोदींची केलेली नक्कल आणि अधिवेशनावेळी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्यामुळे त्यांच्या शिंदे गटातील समावेशाला विरोध करण्यात आला, अशी माहिती माझ्याकडे असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले. तुम्ही याबाबत खासगीत एकनाथ शिंदे यांना विचारा, असेही रामदास कदम यांनी म्हटले.
भास्कर जाधव यांना त्यावेळी शिंदे गटात येण्याची इच्छा होती. पण शिवसेना नेतृत्त्वाने त्यांना सांगितले की, थोडे दिवस थांबा, आम्ही भाजपची समजूत घालतो. पण भाजपने नंतरही भास्कर जाधव यांच्या समावेशाला विरोध कायम ठेवल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. त्यामुळेच भास्कर जाधव आता उद्धव ठाकरे यांना तुम्ही भाजपसोबत गेल्यास मी तुमच्यासोबत येणार नाहीत, असे म्हणत आहेत. उद्या उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र आले तरी भाजप भास्कर जाधव यांना सोबत घेण्याची परवानगी देणार नाही. त्यामुळेच उद्या उद्धव ठाकरे भाजपसोबत गेल्यास आपलं काय होणार, ही भीती भास्कर जाधव यांना वाटत आहे. त्यामुळे भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाऊ नका, अन्यथा मी सोबत नसेन, असे सांगत असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले.
रवींद्र वायकरांकडून खोके मिळाले नाहीत म्हणून उद्धव ठाकरेंनी मंत्रीपद दिले नाही: रामदास कदम
यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक गंभीर आरोप केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांच्याकडे मंत्रिपदासाठी खोक्यांची मागणी केली होती. ते खोके देऊ शकलो नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी मला मंत्रीपद दिलं नाही, असे रवींद्र वायकर यांनी खासगीत सांगितले होते. उद्धव ठाकरे हे रवींद्र वायकरांना हेलिकॉप्टरने खोपोलीला घेऊन गेले होते. तिथेही उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकर यांच्याकडून काही मिळतेय की नाही, याची चाचपणी केली. पण रवींद्र वायकर यांच्याकडून खोके न मिळाल्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. या सगळ्यामुळेच वायकरांनी शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला असावा, असे रामदास कदम यांनी म्हटले.
आम्ही त्यांना 'मातोश्री कॅबिनेट किचन' म्हणायचो: रामदास कदम
रवींद्र वायकर हा मातोश्रीच्या किचनमधला माणूस, अतिश्य जवळचा माणूस होता. आम्ही सगळे त्यांना मातोश्री किचन कॅबिनेट म्हणायचो. पण इतक्या जवळची माणसं लांब का जात आहेत, याविषयी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. मध्यंतरी ठाकरे वहिनी आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नीने एकत्र जागा घेतल्याची चर्चा होती. दोन्ही कुटुंबांमध्ये इतके घनिष्ट संबंधअसताना अशी वेळ का यावी, या गोष्टीचा उद्धव ठाकरे यांनी विचार केला पाहिजे. खोपोलीला मातोश्री वृद्धाश्रम उभारण्यात आणि मुंबईतील शिवसेना भवन उभारण्यात रवींद्र वायकर यांचा मोठा वाटा होता. तरीही रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर का जात आहेत? मुळात अपक्ष धनिक आमदारांना मंत्रीपद द्यायचे आणि कुटुंबातील लोकांना बाहेर ठेवायचे, असे उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. रवींद्र वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर याविषयी आणखी माहिती समोर येईल, असे रामदास कदम यांनी म्हटले.
आणखी वाचा
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदेंची साथ देणार; आज जाहीर पक्षप्रवेश