Vidarbha Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजले असून जवळ जवळ सर्वच पक्षानी जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. मात्र, या निवडणुकांची रणधुमाळी ज्या पूर्व विदर्भापासून (Vidarbha) सुरूवात होणार आहे, त्या मतदारसंघात महायुती आणि महविकास आघाडीच्या वतीने अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने मोठ्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे  महायुती आणि मविआचे पूर्व विदर्भातील उमेदवार आज जाहीर होतील का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.


आगामी लोकसभा निवडणुका विदर्भातल्या पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात 19  एप्रिलला आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पाच मतदारसंघात 26 एप्रिलला होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात निवडणुकीची अधिसूचना 20 मार्चला निघणार असून 27 मार्चला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 


पूर्व विदर्भातील उमेदवार काही ठरेना


विदर्भात 10 मतदारसंघ आहे. त्यापैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने म्हणजेच भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले आहे. तर उर्वरित सहा उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतर्फे विदर्भातील दहाही मतदारसंघात अद्याप एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मविआमध्ये कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार आहे, या संदर्भात अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहे.


विदर्भातील बहुचर्चित रामटेकची जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे राहणार आहे, कि त्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार दिला जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने ही जागा नेमकी कुणाला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच विदर्भातील अकोलामध्ये कोण लढणार, अमरावतीमध्ये कोण लढणार, वर्ध्याची जागा खरोखर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी सोडली जाणार आहे का? अशी अनेक प्रश्न महाविकास आघाडीमध्ये अद्याप कायम असल्याने महाविकास आघडीला सर्वात आधी या जागा वाटपाचा तिढा सोडवणे फार महत्वाचे ठरणार आहे. कारण मविआमध्ये प्रामुख्याने विदर्भात वंचित बहुजन आघाडीची देखील उपस्थिती असून वंचितने अकोल्याची जागा स्वत: प्रकाश आंबेडकरांसाठी मागितलेली आहे. त्यामुळे या जागवापाच तिढा नेमका कधी सुटतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.  


महायुतीमध्ये भाजपचे धक्कातंत्र? 


महायुतीमध्ये विदर्भात दहा मतदारसंघापैकी असूनही सहा जागावाटपाच तिढा अद्याप कायम आहे. तर येत्या दोन दिवसात हा जागवाटपाच तिढा सुटेल असे सुतोवाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले आहे.असे असले तरी भाजपचे जे काही उच्चपदस्थ सूत्र आहेत त्यांच्याकडून जी काही माहिती मिळत आहे, त्याप्रमाणे भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली मतदारसंघात भाजपचे  विद्यमान खासदारांचे वर्चस्व असल्याने भाजप या जागा सोडणार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी फक्त उमेदवार कोण राहणार, हे पाहणे उत्सुकता ठरणार आहे. सोबतच अशीही माहिती पुढे आली आहे की, या मंतदारसंघात विद्यमान खासदारांना यंदा संधी मिळणार नसून नवीन उमेदवार भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली मध्ये दिले जाऊ शकतात. 


'या' मतदारसंघात जागावाटपचा तिढा कायम  


रामटेक संदर्भात असूनही शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मात्र शक्यता अशी आहे की हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटेल. मात्र त्या ठिकाणी भाजपच्या मर्जीतील अनुकूल उमेदवार देण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे.  त्यामुळे त्या ठिकाणी विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना संधी दिली जाते, की नविन चेहऱ्यांना संधी दिली जाते याबाबतची घोषणा लवकरच होणे अपेक्षित आहे. महायुतीमध्ये सर्वात महत्त्वाची रस्सीखेच ही यवतमाळ-वाशिम या मतदारसंघासाठी बघायला मिळत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे या मतदारसंघाला विशेष महत्व प्राप्त झाले असून भाजपने या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. मात्र कुठल्याही परिस्थितित शिवसेना हा मतदारसंघ द्यायला तयार नाहीये. शिवसेनेला जरी हा मतदार संघ सुटला तरी उमेदवार कोण, हे पाहणे उत्सुकते ठरणार आहे. कारण एकीकडे विद्यमान खासदार भावना गवळी यांनी प्रचंड जोर लावलेला दिसत असताना उमेदवार बदलण्यात येणार असल्याची देखील चर्चा भाजप आणि शिवसेना गटात रंगताना दिसत आहे. 


बुलढाणा मतदारसंघाच्या संदर्भात असे म्हटले जात आहे की, या मतदारसंघातील विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते. तर अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कोणता पक्ष कुठे लढेल इथपर्यंत चित्र स्पष्ट झालेले आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये 10 मतदारसंघात कोणता उमेदवार कुठे लढेल, या बाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे आता जलदगतीने महाविकास आघाडीला जागावाटपाचा गुत्ता सोडवणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


MP List Vidarbha: विदर्भातील सर्व 10 खासदारांची यादी; कोणत्या पक्षाचे किती खासदार?