Nashik Amruta Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार (Amruta Pawar) यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून त्यांनी पक्ष प्रवेश करताना केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत असं राष्ट्रवादी पक्षाने म्हटलं आहे. मुळात त्या जिल्हा परिषद सदस्या (Nashik ZP) म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या चिन्हावर निवडून आल्या असताना त्यांनी नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतली. तसेच भाजपच्या अनेक कार्यक्रमात तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या थेट सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठतेबाबत शिकवू नये अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


नाशिकमधून (Nashik) राष्ट्रवादीला नुकताच एक मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उपस्थित भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी अमृता पवार यांनी स्थानिक नेतृत्वाकडून अनेकदा अडवणूक केल्याचे सांगत आपल्या गटाला लोकांच्या कामासाठी निधी मिळू दिला नाही. कामे झाले, तर त्याचे श्रेय स्वतःच घेतले असे आरोप केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने अमृता पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कॉंग्रेस मधून बाहेर पडत पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना केली, त्यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेऊन अनेकांनी त्यांना साथ दिली. त्यामध्ये सर्वप्रथम छगन भुजबळ हे होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर असतानादेखील त्यांनी ती संधी धुडकावून राष्ट्रवादी कॉंग्रेसला खंबीर साथ दिली. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस घराघरात पोचविण्यासाठी भुजबळ साहेब हे रात्रंदिवस फिरले.


पत्रकात पुढे म्हटले आहे की, अमृता पवार या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या तिकिटावर देवगाव गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. मात्र त्यांनी या संपूर्ण कार्यकाळात पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली. त्या कायमच भाजपच्या संपर्कात राहिल्या. केवळ सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी मनात द्वेष ठेऊन त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहे. तसेच त्यांच्या जाण्याने पक्षाला कुठलाही फरक पडणार अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


कोण आहेत अमृता पवार?


नाशिक जिल्हा परिषद सदस्या आणि गोदावरी अर्बन को. ऑप. बॅंकेच्या विद्यमान अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी, खा. सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय, माजी खा. स्वर्गीय वसंतराव पवार व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकच्या माजी सरचिटणीस, निलीमाताई पवार यांच्या सुकन्या अमृता पवार आहेत. पेशाने त्या आर्किटेक्चर आहेत.