Maharashtra politics : 'आपकी बार किसान सरकार' असा नारा देत बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीने आपला मोर्चा आता महाराष्ट्राकडे वळवला आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील हे आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्यासोबत काम करणार आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या बीआरएससोबत आता राज्यातील शेतकरी नेतेही खांद्याला खांदा देत असल्याने इतर राजकीय पक्षांसमोर भविष्यात मोठे आव्हान असणार आहे.


तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष मागच्या सहा महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये पाय रोवू पाहत आहे. तेलंगणा राज्याच्या सीमा लगतचच्या नेत्यासोबतच राज्यातील अनेक आजी-माजी खासदार, आमदारानी मोठ्या धूम धडाक्यात बीआरएस मध्ये प्रवेश केलाय. राज्याच्या सीमा लगत असलेल्या हैदराबादमध्ये रोज महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या नेत्यांचा बीआरएस मध्ये प्रवेश होत आहे. विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात बीआरएस पक्षाच्या जाहीर सभा देखील पार पडल्या. 


मुख्यमंत्री राव यांना अखेर शेतकरी नेता मिळाला...


तर, के चंद्रशेखर राव यांच्या एकूण राजकीय वाटचालीवरती शेतकरी संघटनेच्या शरद जोशी यांच्या विचाराचा मोठा पगडा राहिलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्याआधीच शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपल्या पक्षाचा महाराष्ट्रातील चेहरा बनवा अशी अपेक्षा मुख्यमंत्री राव यांची होती. मात्र राजू शेट्टी यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. तेव्हापासूनच शेतकरी संघटनेचा बडा नेता आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न बीआरएस करत होती. त्यातच आता रघुनाथ दादा पाटील यांची त्यांना साथ मिळाली आहे. 


दरम्यान, शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या वेगवेगळ्या संघटना झाल्यानंतर रघुनाथ दादा पाटील यांनीही राज्यभर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोट बांधली आहे. शिवाय रघुनाथ दादा पाटील हे शेतकरी संघटनेच्या देशवापी किसान आघाडीचे प्रमुख आहेत. याचा फायदा महाराष्ट्रामध्ये आगामी काळात बीआरएसला होणार आहे.


उद्या कोल्हापूर दौरा... 


बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात एन्ट्री केल्यापासून मुख्यमंत्री राव यांचे राज्यात सतत दौरे होतायत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर दौरा करून, विठ्ठलाचे दर्शन घेतले. विशेष या दौऱ्यात त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ पाहायला मिळाले होते. आता मुख्यमंत्री राव उद्या पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करत असून, ते कोल्हापूरमध्ये असणार आहे. दरम्यान याच दौऱ्यात ते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेणार आहे. त्यामुळे त्यांच्या उद्याच्या दौऱ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: