Maharashtra Politics Eknath Shinde: संपूर्ण महाराष्ट्रासाठी दोन जुलैचा रविवार एका महानाट्याची साक्ष देणारा ठरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट राहून राहून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर करतेय ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराजी.


जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर त्यांच्या बंडाचे प्रमुख कारण हे शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत असलेली युती असं शिंदे गटातील आमदारांकडून सांगण्यात येत होतं. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलं होतं की, 'आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार नाही, म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे'. पण आता अजित पवारांनी घेतलेली शपथ ही एकनाथ शिंदे यांना योग्य वाटते का हा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे


2019 मध्ये फडणवीस-पवार यांच्या शपथविधीनंतर आज हा दुपारी झालेल्या शपथविधीनंतर खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण झाला असं म्हणणं देखील काही वावगं ठरणार नाही. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि या घडामोडींना नाराजीनाट्याने नामांतर करण्यात आलं. पण आता शिवसेनेत ज्या कारणामुळे बंड झालं ते कारणच शिंदे सरकारबरोबर आल्याने शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. 


'महाराष्ट्राला लवकरच नवे मुख्यमंत्री मिळतील'


या चर्चांना आणखी रंगतदार केलं ते संजय राऊत यांच्या वक्तव्यानं. अजित पवार यांच्या शपथविधीचा सोहळा झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्राला लवकरच नवे मुख्यमंत्री मिळतील.' राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात होणाऱ्या आणखी एका बदलाची ही नांदी तर नाही ना हा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे. 


मंत्रिपदाची शपथ आणि शिंदे गटाची नाराजी?


शिंदे आणि फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार पार पडला. दोन्ही पक्षातील आमदारांना मंत्रीपदाचे वाटप देखील करण्यात आले. पण त्यानंतर प्रश्न राहिला दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीपदाच्या विस्ताराचा. पण आता राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत अशा चर्चा रंगू लागल्या आहे. अनेक मंत्री हे दुसऱ्या टप्प्यातील  मंत्रीपदाच्या विस्ताराची वाट पाहत होते. पण राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला. या आमदारांमुळे आता शिंदे गटातील आमदार नक्की कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शिवसेनेतील बंडानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवली. त्यामुळे आता शिंदे गटातील आमदार अपात्र ठरणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या आमदारांचा बॅकअप ऑप्शन तयार केल्याचं देखील म्हटलं जात आहे. पण यामुळे शिंदे आणि त्यांच्या आमदारांना मोठा फटका तर बसणार नाही ना हा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या नाराजीनाट्याचा शेवट नेमका कसा होतो हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे. 


हे ही वाचा :


Ajit Pawar : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ...