Maharashtra Politics Ajit Pawar: राज्यात शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपचे सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधी बाकांवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांची वर्णी लागेल याबाबत चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची नावे आघाडीवर होती. अखेर पक्षाने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याबाबतचे अधिकृत पत्र विश्वास दर्शक ठराव मतदानानंतर विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.
सरकारमध्ये असताना अजित पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांचा प्रशासनात आदरयुक्त धाक होता. त्याशिवाय अजित पवार आपल्या वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जातात. त्यामुळे अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना त्यांच्या टीकेचे बाण सहन करावे लागणार आहेत.
मध्यावर्तीची तयारी करा; शरद पवारांचे आमदारांना आवाहन
दरम्यान, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या असेही त्यांनी म्हटले. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळे तयारी आतापासून तयारी करा असे आवाहन शरद पवार यांनी केले.