CM Eknath Shinde:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे नागपुरातून तातडीने मु्ंबईला रवाना झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजशिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपतींना राजभवनात त्यांनी सोडले. त्यानंतर मुख्यमंत्री तातडीने मुंबईच्या दिशेने निघाले. 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नागपुरात (Nagpur News) आगमन झाले. उद्या सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. नागपूरमध्ये राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील नागपूरात थांबणार होते. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री गडचिरोली आणि नागपूरमध्ये थांबणार होते. मात्र, राष्ट्रपतींचा आजचा मुक्काम असलेल्या राजभवनात त्यांना सोडल्यानंतर मुख्यमंत्री तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


रविवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता अजित पवार यांची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या.
 
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये  अजित पवार यांना कंटाळून आपण सरकारमधून बाहेर पडत असल्याचे शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी म्हटले. अजित पवार यांनी निधी वाटपातही दुजाभाव करत शिवसेनेची कामे थांबवली असल्याचा दावा केला होता. वर्षभरापूर्वी झालेल्या राजकीय नाट्यानंतर आता दोन दिवसापूर्वी झालेल्या नाट्यामुळे पुढील  अंक रंगण्याची चिन्हं आहेत. 


अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये आलेल्या मंत्र्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांकडील महत्त्वाची खाती हवी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याशिवाय, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती नागपुरात असतानाही मुंबईकडे तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


शिवसेना शिंदे गटाची बैठक


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सायंकाळी 7 वाजता सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, पक्षाची भूमिका आदी मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. 


उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका होणार आहेत. यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात आमदार, खासदार, राज्य कार्यकारणीपासून ते तालुका अध्यक्षांपर्यंत बोलावण्यात आले आहे. तर, दुपारी अजित पवार यांनी देखील पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता शिंदे गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे.