Akola News अकोलाशरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कधीही राष्ट्रीय नेता होण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या राष्ट्रवादी पक्षात अजित पवार  (Ajit Pawar) आणि तिकडे शरद पवार (Sharad Pawar) याबाबत निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. त्यामुळे दोन मोठ्या माणसांच्यामध्ये आपण आपलं तोंड शांत ठेवलेलं कधीही चांगले असल्याचा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) रोहित पवरांना दिला आहे. 


अजित पवार गटाचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अशातच सोमवारी सकाळपासून निलेश लंके हे आजच शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत कोणतेही ठोस भाष्य न करता या प्रकरणातील सस्पेन्स कायम ठेवला आहे. या प्रकरणावर बोलतांना आमदार रोहित पवार यांनी निलेश लंके यांनी लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जर का ते पुन्हा  शरद पवार साहेबांकडे येणार असतील तर, आम्ही त्यांचे स्वागतच करणार असल्याचे रोहित पवार म्हणाले आहे. यावरून आता अमोल मिटकरींनी रोहित पवरांना खडे बोल सुनावले आहे. 


निलेश लंके यांना अजितदादांनी पाठबळ दिलंय


स्वत: शरद पवार साहेबांनीच या चर्चेचं आज खंडन केलंय. त्यामुळे आज किंवा उद्या त्यांच्या पक्षप्रवेशाचं कुठेही काही दिसत नाहीये. लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत, असं गेल्या काही दिवसापासूनच्या चर्चा मी देखील ऐकतोय. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना अजितदादांनी मोठे पाठबळ देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मला तरी असं वाटतेय लंके साहेब तिकडे जाणार नाही, असा विश्वास अमोल मिटकरींनी  बोलतांना व्यक्त केलाय. 


शरद पवार नेमकं काय म्हणाले?


निलेश लंके पुन्हा तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत का, असा प्रश्न सोमवारी सकाळच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारण्यात आला होता. परंतु, त्यावेळी शरद पवार यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. या सगळ्या चर्चेला काही अर्थ नाही. निलेश लंके यांना पुन्हा आमच्या पक्षात घेण्याची चर्चा एकदम कशी काय सुरु झाली? आमच्या पक्षात येण्यासाठी निलेश लंके यांच्यासारखे अनेक लोक इच्छूक आहेत. मग त्यांना विचारलं नसतं का? निलेश लंके यांचा आज आमच्याकडे पक्षप्रवेश आहे, हे मलाच माहिती नाही. मी तुमच्याकडूनच ही गोष्ट ऐकतोय, असे शरद पवार यांनी म्हटले होते.


परंतु, त्याच्या काहीवेळानंतरच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमदार निलेश लंके यांनी सोमवारी सकाळी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही. परंतु, या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी, 'निलेश लंके लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येतील', असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशाविषयीचा सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.


आणखी वाचा