Maharashtra Politicial Crisis : एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना हाताशी घेऊन केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेय. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे राज्यातील वातावरण तापलेय. एकाही बंडखोर आमदाराने समोर येऊन बोलावे, लगेच मुख्यमंत्रिपद सोडतो, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर तडकाफडकी वर्षा निवसस्थानावरुन मातोश्रीवर रवाना झाले. उद्धव ठाकरे मातोश्रीवर आले तेव्हा शिवसैनिकांची गर्दी झाली. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत राज्यभर आंदोलनं केली आहेत. आता 92 वर्षांच्या आजीही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसाठी पुढे आल्या आहेत. 


नवनीत राणांविरोधात केलेल्या हटके आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या 92 वर्षांच्या शिवसेनेच्या फायरबॅण्ड आजी चंद्रभागा शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं समोर आले आहे. आजी जवळपास तासभर मातोश्रीमध्ये होत्या. आजींना मुख्यमंत्री स्वतः भेटले की इतर कोणी ? हे अद्याप समजलेलं नाही. पण तासभर आजी मातोश्रीमध्ये होत्या. एकीकडे आज परभणीच्या खासदारांसह ईतर पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली असतांना आजींना मात्र एन्ट्री मिळाली आहे.


मातोश्रीला भेट दिल्यानंतर काय म्हणाल्या आजी? 
साहेब काळजी करु नका.. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं चंद्रभागा शिंदे यांनी म्हणाल्या. रिक्षावाला होता, त्याला आमदार केला. तरी तो आपल्यातून गेला... तरी तुम्ही काळजी करायची नाही. तुमच्यापाठीमागे आम्ही शिवसैनिक आहोत. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर शिवसेनेच्या फायर आजी चंद्रभागा शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तुम्ही काळजी करु नका, शिवसैनिक तुमच्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरेंना सांगत दिलासा दिलाय.  तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊ नये, असेही आजींनी सांगितले. बंडखोर आमदार माघारी येणार का? या प्रश्नावर बोलताना आजी म्हणाल्या की, कट्टर शिवसैनिक असले तर साहेबांकडे माघारी येतील.. जे गेले ते गेले... ते शिवसैनिक नाहीत... असे आजी म्हणाल्या. एकनाथ शिंदे माफी मागायाला येतील... उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाणार नाहीत, असेही आजींनी सांगितलेय. 



'फायर आजी' नेमक्या कोण? -
92 वर्षीय आजींचं नाव चंद्रभागा गणपत शिंदे. मुंबईतील शिवडी येथील त्या रहिवासी. अजुनही शिवडी नाक्यावर भाजीचा व्यवसाय करतात. गणपतीत पूजेचं साहित्यही विकतात. तर पोलिसदूत म्हणून विभागात काम करतात आणि पोलिसांनाही सामाजिक कामात मदत करतात. आजींना दोन मुलं आणि दोन नातवंड आहेत. तर आजींचे पती बीपीटीमध्ये कामाला होते. सध्या ते हयात नाहीत. त्यामुळे आजींना त्यांची पेन्शन मिळते. आजींना विचारलं की, तुम्ही केव्हापासून शिवसैनिक आहात, तर त्या बाळासाहेबांपासून शिवसैनिक असल्याचं सांगतात. तसं आजींचं शिवसेनेसोबतंच नातंही खास आणि तितकंच सलोख्याचं. बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक चंद्रभागा आजी. दरम्यान, नवनीत राणांविरोधात शिवसेनेच्या आंदोलनादरम्यान चंद्रभागा शिंदे प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांद्रभागा शिंदे यांच्या घरी जाऊन भेटही दिली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :