Shiv Sena vs Navneet Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणाचा इशारा दिल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं. त्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राणा विरुद्ध शिवसेना हा संघर्ष गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर मातोश्रीबाहेर कालपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही शिवसैनिकांनी सुरक्षा कवच दिलं आहे. अशातच मातोश्रीचं सुरक्षा कवच बनलेल्या शिवसैनिकांमध्ये एक 92 वर्षांच्या आजीबाईही होत्या. एबीपी माझानं त्यांच्याशी बातचित केल्यानंतर आता आजींची दखल थेट मातोश्रीवरुन घेण्यात आली आहे. राणांविरोधात आंदोलन करणाऱ्या आजींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर आजी काळजी घ्या, असंही मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा आजींना सांगितलं आहे. दरम्यान, या आजी सकाळपासून मातोश्रीबाहेर पहारा देत असून आमच्या वहिनींना, साहेबांना त्रास देतायत, आम्ही त्यांना इंगा दाखवणारच, असा इशाराही राणा दाम्पत्यांना दिला आहे.
राणांच्या इशाऱ्यामुळे शिवसैनिक मुंबईतील खार येथील राणांच्या घरासमोर जमलेत आणि राणांना घराखाली या असं आव्हानही दिलं. तर दुसरीकडे मातोश्री निवासस्थानाबाहेरही शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राणांविरोधात खारच्या घराबाहेर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली, तर राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर मातोश्रीबाहेर कालपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही शिवसैनिकांनी सुरक्षा कवच दिलं आहे. शिवसैनिक म्हणजे, ठाकरेंचा कणा, असं अनेकदा आपण ऐकतो. पण सध्या मातोश्रीबाहेर पाहारा देणाऱ्या शिवसैनिकांमध्ये एक कडवट शिवसैनिक असणाऱ्या आजीबाईही पाहायला मिळाल्या. एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी यानिमित्तानं संवाद साधला, त्यावेळी त्यांना आपलं वय विचारलं त्यांनी सांगितलेलं वय ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. माझं वय 92 वर्ष असल्याचं आज्जींनी सांगितलं.
आज्जींनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "राणा आलेत ना, दोन दिवस त्रास देतायत मातोश्रीवर. आमच्या वहिनींना त्रास देत आहेत ना, म्हणून आम्ही शिवसैनिक त्यांना इंगा दाखवणार आहोत. तुमची हिंमत कशी झाली? माझं वय 92 वर्ष आहे. आमच्या साहेबांवर संकट आलेलं आम्ही दूर करणार, साहेबांसाठी आम्ही झटणार. राणांना वाटत असेल दोघजण येऊन आम्ही गपचूप जाऊ. पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही येऊन दाखवाच. मातोश्रीवर येऊन दाखवच."
आमच्या साहेबांना छळण्याऐवजी आमच्यासमोर येऊन दाखवा तुम्ही : शिवसैनिक आजी
"मी बाळासाहेब होते तेव्हापासून शिवसैनिक आहे. तेव्हापासूनच मी मातोश्रीवर येते. साहेबांनाही भेटले होते मी. काही लोकं उद्धव साहेबांना सारखं छळतायत. त्यांना मी सांगते, आमच्या साहेबांना छळण्याऐवजी आमच्यासमोर येऊन दाखवा तुम्ही. त्यांना छळू नका. ते जनतेसाठी चांगलं काम करत आहेत. ते तुमच्यासारखी लबाडबाजी करत नाहीत.", असा इशारा आजीबाईंनी राणा दाम्पत्यांना दिला आहे.
बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिक असणाऱ्या या आज्जी आज सकाळपासूनच युवासैनिकांसोबत मातोश्रीबाहेर पाहारा देताना दिसून आल्या. युवासैनिकांसोबत मोतोश्रीबाहेरील रस्त्यावर बसून आज्जीबाईंनी भजनं आणि आरत्या गाण्यास सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे निवासस्थान मातोश्री म्हणजे, शिवसैनिकांसाठी आजही जणू मंदिरासारखं, असं अनेक शिवसैनिक सांगतात. अशातच या 92 वर्षांच्या आज्जी अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात बसून मातोश्रीचं सुरक्षाकवच म्हणून खंबीरपणे उभ्या असल्याचं दिसून आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :