Shiv Sena vs Navneet Rana : सध्या राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) यांमुळे राजकीय वादंग पाहायला मिळत आहे. सध्या या मुद्द्यांवरुन शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध राणा दाम्पत्य (Navneet Rana) असा वाद पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणांच्या इशाऱ्यामुळे शिवसैनिक मुंबईतील खार येथील राणांच्या घरासमोर जमलेत आणि राणांना घराखाली या असं आव्हानही दिलं. तर दुसरीकडे मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेरही शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राणांविरोधात खारच्या घराबाहेर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली, तर राणा दाम्पत्यांच्या (Ravi Rana) इशाऱ्यानंतर मातोश्रीबाहेर कालपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही शिवसैनिकांनी सुरक्षा कवच दिलं आहे. शिवसैनिक म्हणजे, ठाकरेंचा कणा, असं अनेकदा आपण ऐकतो. पण सध्या मातोश्रीबाहेर पाहारा देणाऱ्या शिवसैनिकांमध्ये एक कडवट शिवसैनिक असणाऱ्या आजीबाईही पाहायला मिळाल्या. एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी यानिमित्तानं संवाद साधला, त्यावेळी त्यांना वय विचारलं त्यांनी सांगितलेलं वय ऐकून सर्वांना धक्काच बसला. माझं वय 92 वर्ष असल्याचं आज्जींनी सांगितलं.


आज्जींनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "राणा आलेत ना, दोन दिवस त्रास देतायत मातोश्रीवर. आमच्या वहिनींना त्रास देत आहेत ना, म्हणून आम्ही शिवसैनिक त्यांना इंगा दाखवणार आहोत. तुमची हिंमत कशी झाली? माझं वय 92 वर्ष आहे. आमच्या साहेबांवर संकट आलेलं आम्ही दूर करणार, साहेबांसाठी आम्ही झटणार. राणांना वाटत असेल दोघजण येऊन आम्ही गपचूप जाऊ. पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही येऊन दाखवाच. मातोश्रीवर येऊन दाखवच."


"मी बाळासाहेब होते तेव्हापासून शिवसैनिक आहे. तेव्हापासूनच मी मातोश्रीवर येते. साहेबांनाही भेटले होते मी. काही लोकं उद्धव साहेबांना सारखं छळतायत. त्यांना मी सांगते, आमच्या साहेबांना छळण्याऐवजी आमच्यासमोर येऊन दाखवा तुम्ही. त्यांना छळू नका. ते जनतेसाठी चांगलं काम करत आहेत. ते तुमच्यासारखी लबाडबाजी करत नाहीत.", असा इशारा आजीबाईंनी राणा दाम्पत्यांना दिला आहे. 


स्वतःला बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिक म्हणणाऱ्या या आज्जी आज सकाळपासूनच युवासैनिकांसोबत मातोश्रीबाहेर पाहारा देताना दिसून आल्या. युवासैनिकांसोबत मोतोश्रीबाहेरील रस्त्यावर बसून आज्जीबाईंनी भजनं आणि आरत्या गाण्यास सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Pramukh Balasaheb Thackeray) यांचं हे निवासस्थान मातोश्री म्हणजे, शिवसैनिकांसाठी आजही जणू मंदिरासारखं, असं अनेक शिवसैनिक सांगतात. अशातच या 92 वर्षांच्या आज्जी अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात बसून मातोश्रीचं सुरक्षाकवच म्हणून खंबीरपणे उभ्या असल्याचं दिसून आलं. 


दरम्यान, नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणाचा इशारा दिल्यापासूनच शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणा विरुद्ध शिवसेना संघर्ष आज दुसऱ्या दिवशी आणखी तीव्र झाला. आज सकाळी 9 वाजता मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार राणा दाम्पत्यानं केल्यानंतर शिवसैनिकांनी आज राणांच्या घरासमोरच फिल्डिंग लावली. दुसरीकडे पोलिसांनीही राणा यांना घरातच रोखलं. त्यामुळे राणा दाम्पत्य घराबाहेर पडू शकलं नाही. त्यानंतरही राणांनी मातोश्रीसमोर जाण्याचा निर्धार केला असला, तरी राणा दाम्पत्य घराबाहेर पडणार कसं असा प्रश्न आहे. कारण राणांच्या दारात पोलीस आहेत आणि घराखाली शिवसैनिक आहेत. पोलिसांनी राणांना घराबाहेर पडल्यास रोखण्याचा इशारा दिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :