Sanjay Raut reaction on threatening letter to Raj Thackeray :  काल राज ठाकरेंना (Raj Thackeray) जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तसेच राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे नांदगावकरांनी सांगितले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहे, इथे कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, आणि जर लागत असेल तर ठाकरे सरकारकडून सुरक्षा दिली जाईल, महाराष्ट्रातील नेत्याला हात लावायची कुणाची हिंमत नाही, शिवसेना भवनात असे धमकीचे पत्र रोज येतात, त्यामुळे ही स्टंटबाजी सोडून द्या, असं संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आणखी काय म्हणाले संजय राऊत?


रमेश लटके हे निष्ठावंत शिवसैनिक होते.


अंधेरी पूर्व विधानसभाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते कुटुंबासह दुबईत फिरायला गेले असताना काल सायंकाळी त्यांचं निधन झालं. रमेश लटके हे निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांचं पार्थिव उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी दुबईहून आणले जाईल, अनेक वर्षांपासून त्यांनी शाखाप्रमुख ते नगरसेवक, आमदार अशा विविध पदांवर भूमिका बजावली, कालच आमचं बोलणं झालं, आणि आज अचानक अशी दुर्देवी बातमी आली असे सांगत राऊत यांनी रमेश लटकेंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 


नवलानींना देशाबाहेर जाण्यास मदत, राऊतांचा आरोप


नवलानीविरोधात एसीबीकडून चौकशी सुरू आहे, दरम्यान नवलानींना देशाबाहेर जाण्यास मदत करण्यात आली आहे. असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, ईडी अधिकाऱ्यांसाठी उद्योजक, व्यावसायिकांकडून वसुली करत असल्याचा आरोप असलेल्या जितेंद्र नवलानी विरोधात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लूक आऊट नोटीस जारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवलानी हा परदेशात फरार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळेच नवलानी विरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात आरोप केले होते. त्यानंतर नवलानी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.


राजद्रोह कलमाबाबत न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत


राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. राजद्रोहाच्या कलमाअंतर्गत नवे गुन्हे दाखल करू नका, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. याबाबत संजय राऊत यांनी न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे, देशाला स्थिरता हवी आहे, कायद्याच्या राजकीय गैरवापरामुळे निर्णय घेण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, या प्रकारचे गुन्हे प्रलंबित असलेल्या आरोपींनी न्यायालयात दाद मागावी, असं देखील कोर्टानं सांगितलं आहे.