NCP Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे आणि सर्वांचे आभारही मानले आहेत. सुप्रिया सुळेंवर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे. 


खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन त्यांच्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी आणि प्रफुल्लभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.


अखेर भाकरी फिरवलीच...


शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषण करत राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांचा मान राखून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला होता. हे सगळं घडत असताना त्यांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. भाकरी वेळेत फिरवली नाही तर ती करपते. हे वक्तव्य केल्यानंतर भाकरी फिरवण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादीची जबाबदारी नेमकी कोणाच्या खांद्यावर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नावांची चर्चा होती. त्याच नावांवर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केला आहे. त्यांनी दिल्लीत आज राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून  प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. दिल्लीतील प्रत्येक कार्यक्रमात सुप्रिया सुळे कायम उपस्थित असतात मात्र या घोषणेवेळी त्या दिल्लीतील कार्यक्रमात उपस्थित नव्हत्या. मात्र अजित पवार या कार्यक्रमात उपस्थित होते.





 


 


संबंधित बातमी-


NCP : प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची मोठी घोषणा