पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीत अधिकाधिक जागा लढवण्याचा काँग्रेसचा (Congress) प्रयत्न आहे आणि त्यातूनच माढा लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवण्यात येतो, त्याचबरोर या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस वर्षानुवर्षे लढवत आली आहे. मात्र आता काँग्रेसने या मतदारसंघांवर दावा सुरु केला आहे. 


आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसला पक्षविस्ताराची संधी दिसू लागली आहे आणि त्यातूनच आतापर्यंत जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवण्यात येत होते त्या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा करायला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावात झालेल्या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणुकीला लागा, असा आदेश दिला. 


या मतदारसंघातील माण - खटाव , फलटण , अकलूज , माढा , सांगोला आणि करमाळा हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवण्यात येतात. शरद पवार भाजपसोबत न जाता महाविकास आघाडीतच राहतील याचा विश्वास असला तरी राष्ट्रवादीचे बरेच नेते अजित पवार गटात गेल्यानं काँग्रेसने या मतदारसंघांवर दावे करायला सुरुवात केली आहे.  


2009 साली शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2014ला विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून इथून निवडणून आले. मात्र 2019 ला काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष असलेल्या रणजित निंबाळकरांना भाजपने उमेदवारी दिली आणि ते भाजपचे खासदार बनले. त्यानंतर काँग्रेसचे माण - खटावचे आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये गेले. त्यानांतर विजयसिंह मोहिते पाटलांनीही भाजपचा रास्ता धरला.  तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या मतदारसंघातील बबनदादा शिंदे, संजय शिंदे, रामराजे निंबाळकर हे आमदार अजित पावांसोबत गेले . मात्र तरीही या मतदारसंघांमधून आपलेच उमेदवार निवडणूक लढवतील, असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे. 


खरंतर या मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार नाही. मात्र मोहिते पाटील घराण्यातील धवलसिंह मोहिते पाटलांकड़े काँग्रेसने या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. ज्या विजयसिंह मोहिते पाटलांना केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रवादीने 2019 पर्यंत इथे वर्चस्व राखलं होतं त्याच मोहिते पाटील घराण्यातील धवलसिंह मोहिते पाटलांना बळ देऊन इथं शिरकाव करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. 


शरद पवार काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नाहीत असा आपल्याला विश्वास आहे असं काँग्रेसचे नेते म्हणतायत. तर दुसरीकडे काँग्रेकडून राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढाव सुरु करण्यात आला आहे. खरंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनकडून देखील सर्व 48 मतदारसंघांचा असाच आढावा घेण्यात आला आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर महाविकास आघाडीला जागावाटपाची समीकरणं नव्याने मांडावी लागणार आहेत, ज्यामध्ये काँग्रेसला संधी दिसत आहे.


संबंधित बातमी-


Mumbai: मुंबईत होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीची तयारी कशी सुरु आहे ?