INDIA meeting in Mumbai: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधक एकत्र येऊन इंडियाच्या माध्यमातून मोट बांधणी सुरू आहे. इंडियाची तिसरी बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीची विरोधकांकडून जय्यत तयारी सुरू झालेली आहे. एवढेच नाही तर लोकसभेला भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकासआघाडी सुद्धा राज्यात कामाला लागलेली पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तीनही पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. 


भाजपचा पराभव करण्यासठी विरोधकांची तयार झालेली इंडिया ही आघाडी होय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला इंडियाच्या माध्यमातून टक्कर दिली जाणार आहे. इंडियाच्या नियोजनासाठी मुंबईत तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दोन दिवशी  पार पडणार आहे. या बैठकीच्या नियोजनासाठी महाविकास आघाडी तयारीला लागली आहे.


मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी कशी सुरु आहे ?


मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन सुरु आहे. या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे.  
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या  स्वागताची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून 31 ऑगस्टला डिनरचं आयोजन करण्यात आलेय. एक सप्टेंबरला काँग्रेस पक्षाकडून नेत्यांच्या लंचचं आयोजन करण्यात आले आहे. 31 ऑगस्टला छोटेखानी बैठक होईल, मुख्य बैठक 1 सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. त्यानंतर तीन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे.


देशभरातील विरोधी पक्षात असलेले 26 पेक्षा अधिक पक्ष हे या बैठकीला हजर राहणार आहेत. यामध्ये देशातील पाच राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सुरक्षेचा ताण पडू शकतो, यासाठी महाविकास आघाडीतील काही नेते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधतील. महाविकास आघाडीतील काही महत्त्वाच्या नेत्यांना विशेष जबाबदारी या अनुषंगाने देण्यात आली आहे. या बैठकीला येणाऱ्या इतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांचा पाहुणचाराची जबाबदारी ही महाविकास आघाडीत वाटून दिली आहे. काही पक्षातील नेते हे 31 ऑगस्टला न येता एक सप्टेंबरला मुख्य बैठकीसाठी हजर राहणार आहेत. तसे त्यांच्याकडून कळवण्यात येत आहे. 


बैठकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे पाच ते सात सदस्यांची एक समिती गठीत  करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड,नरेंद्र वर्मा तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, नसीम खान, संजय निरुपम आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत,अरविंद सावंत, अनिल देसाई ,अनिल परब , सचिन अहीर , आदित्य ठाकरे , विनायक राऊत, प्रियंका चतुर्वेदी या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीचा आढावा म्हणून आज हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे दिल्लीतील दोन नेते यांच्यासोबत बैठक पार पडली. 


मुंबईत पार पडणाऱ्या इंडियाच्या बैठकीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असावा यावर चर्चा होईल. त्याचबरोबर संयोजक कोण असावा, यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात याबैठकीनंतर ही  घोषणा होण्याची शक्यता आहे.एकीकडे महाविकास आघाडीमध्ये इंडियाच्या बैठकीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकांच्या तयारीला महाविकासासाठी लागलेली आहे. तिन्ही पक्षाची तयारी कशी सुरु आहे ?


काँग्रेस


महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा कोअर कमिटीत घेण्यात आलाय. त्यानंतर एका वरिष्ठ नेत्याला दोन लोकसभेचे मतदारसंघ देण्यात आले. या नेत्यांनी मतदारसंघाचा आढावा घेऊन अहवाल सादर केल्यानंतर आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. महाविकास आघाडी एकत्रित असली तरी काँग्रेसने सर्वच जागांचा आढावा घेतलेला आहे.


शिवसेना (ठाकरे गट)


-उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकांच्या सर्व 48 जागांचा आजपासून आढावा सुरु झालाय.


-16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.


-ठाकरे गटाच्या बैठकांचा पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस च्या बालेकिल्ला असलेल्या बारामतीलोकसभा मतदारसंघाचा सुद्धा 18 ऑगस्टला आढावा घेतला जाणार आहे.


राष्ट्रवादी ( शरद पवार गट)


-शरद पवार गटाकडून राज्यभरात ठिकठिकाणी दौरे करून कार्यकर्ता जोडणे मोहीम सुरू होणार आहे.


-यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार राज्यभरात ठीक ठिकाणी दौरेघेताना पाहायला मिळत आहेत.


-शरद पवार यांनी नुकताच नाशिक नंतर आता उद्या बीडमध्ये तर रविवारी पुण्यामध्ये कार्यकर्तामेळावा आणि त्यानंतर जाहीर सभा घेण्याचा निश्चित केलाय.


-ठिकठिकाणी कार्यकर्ते मिळावे घेऊन आगामी काळातील निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्याभावना जाणून शरद पवार घेत आहेत. 


आगामी लोकसभा निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू असं तीनही पक्षांचे नेते सांगत आहेत. पण तीनही पक्षाने बी प्लान म्हणून सर्वच लोकसभा मतदार संघांचा आढावा घेऊन तयारी करत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये तीनही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दगा फटका झाला तरी पक्षाची पूर्ण तयारी असावी. यासाठी तीनही पक्ष कसून तयारी करताना पाहायला मिळत आहे.