Maharashtra Rain Updates : राज्यात गेल्या महिन्याभरापासून सत्तेचा खेळ सुरु आहे. बंडखोरी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, कोण गद्दार, कोण निष्ठावान, कुणाला कोणतं निवडणूक चिन्ह अशा राजकारणात मात्र राज्यातला शेतकरी वाऱ्यावर पडला आहे. राज्यभरात पावसानं धुमशान घातलं आहे. अनेक गावा-खेड्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली असून खेड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. एवढंच नाहीतर मुसळधार पावसानं (Maharashtra Rain) बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. 


राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन जवळपास 25 दिवस उलटले आहेत. मात्र जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये झालेल्या पावसात राज्यातील आठ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, धान आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसला असून तेथील 2 लाख 97 हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, फळपिकांचं नुकसान झालं आहे. विदर्भात जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली आहेत. वर्धा, नागपूर, गडचिरोलीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानाचे पंचनामे कधी होणार, मायबाप सरकार मदत कधी करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 




...तर लोकप्रतिनिधींना शेतकरी रस्त्यावर फिरु देणार नाही : रविकांत तुपकर 


लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच, बळीराजाला राग आला तर लोकप्रतिनिधींना शेतकरी रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. 


शिंदे सरकारनं राज्य वाऱ्यावर सोडलंय : एकनाथ खडसे 


राज्यातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. शिंदे सरकारनं राज्य वाऱ्यावर सोडलं अशी खडसेंनी टीका केली आहे. सध्या राज्यात जनता अडचणीत असताना सरकारकडून मदतीची अपेक्षा असते, मात्र लोकप्रतिनिधी नसल्यानं सरकारनं राज्य प्रशासनाच्या हवाली करून जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याची टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर केली आहे. सध्या राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसानं पूर परिस्थिती निर्माण होऊन नुकसान झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, अशा वेळी सरकारनं जनतेला तातडीनं मदत जाहीर करणं अपेक्षित असते. मात्र राज्यात सध्या मंत्री मंडल अस्तित्वात नसल्याने सरकारने सर्व काही प्रशासनाच्या हाती हवाला केले आहे,प्रशासन काम करीत असले तरी ते एका चौकटीत राहून काम करीत असतात,राज्य अडचणीत असताना लोकप्रतिनिधी नसल्याने सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचं चित्र राज्यात सध्या पाहायला मिळत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकार वर केली आहे. 


दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून सातत्यानं टीकांची तोफ डागली जात आहे. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न सातत्यानं सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येत आहे. एकीकडे राज्यात पावसानं धुमशान घातलं असून अद्याप राज्याला कृषीमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री राज्यात नाही. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसानं हिरावून घेतला आहे. पूरग्रस्त भागांचे पंचनामे होणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मात्र ही मदत कधी मिळणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.