Sanjay Raut : मुंबई आणि औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार असून विरोधी पक्षांच्या आरोपांवर हल्लाबोल करणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नकली हिंदुत्व व विरोधी पक्षांवर निशाणा साधलाय. काय म्हणाले संजय राऊत?


उद्धव ठाकरे सुद्धा अयोध्या दौऱ्यावर


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. लवकरच त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महिन्याच्या 14 तारखेला मुंबईत बीकेसीमध्ये आणि 8 जूनला मराठवाड्यात सभा घेणार आहेत. त्याशिवाय ते अयोध्येचा दौराही करणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.


राऊत म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रभरातील पदाधिकाऱ्यांना संदेश दिलेला आहे, संघटना बांधणीमध्ये कुठेही मागे राहता कामा नये, हल्ल्याला प्रतिहल्ला करावा लागेल, ढोंग्यांचे बुरखे फाडावे लागतील, विशेषतः जे नकली हिंदुत्ववादी आहेत त्यांचे आव्हान वगैरे आम्हाला काहीच नाही, 14 तारखेला बीकेसी येथे सभा आहे, त्यानंतर संभाजीनगर येथे आठ जून ला सभा आहे, संपूर्ण महाराष्ट्रात सभा करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे,


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये घेणार सभा
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांची एक बैठक वर्षा या निवासस्थानी बोलावली होती. दरम्यान, ही पक्षाची अंतर्गत बैठक होती असं संजय राऊत म्हणाले, त्यांनी सांगितलं की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत काय करायला हवं यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. खासदारांच्या मतदारसंघातील प्रश्न त्यांनी समजून घेतले. याशिवाय शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा 26 ते 29 मे या काळात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं  राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवावेत अन्यथा त्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा दिला आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल दिल्याची टीका भाजप आणि मनसेकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून येत्या 1 मे रोजी त्यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याची माहिती संजय राऊत यांनी दिलीय.


भाजपला सध्या बूस्टर डोसची गरज 


भाजप बूस्टर डोस स्वतः घेतात, स्वतःला बूस्टर डोस ची गरज आहे, त्यामुळे एक नव हिंदुत्ववादी बूस्टर डोस ते घेत आहेत, त्यांचे हिंदुत्व तकलादू असल्याने ते घेत असतील, मात्र आम्हाला या कडे बघण्याची गरज नाही, कोणी स्वतःचे मनोरंजन करून घेणार असेल तर घेऊ द्या, असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या शिवसेना विरुद्ध मनसे आणि भाजप असा सामना राज्यात रंगल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेकडून शिवसेनेवर सातत्याने टीका केली जात आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींच्या भोंग्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपवर तुटून पडा असा संदेश दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी आता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, भाजपला सध्या बू्स्टर डोसची गरज आहे, विरोधी पक्षाच्या हल्ल्याला प्रतिहल्ला करावाच लागेल, तसेच तकलादू हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन विरोधी पक्षाकडून केवळ राजकीय हेतू साधण्यात येत असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले.