Kirit Somaiya : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा वाद आता न्यायालयात पोहचला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात मेधा किरीट सोमैया (Medha Kirit Somaiya) यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला शिवडी, मुंबई कोर्टात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,  किरीट सोमय्या यांनी आज पत्रकारांशी बोलताना शिवसेनेला धारेवर धरलं आहे.


संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दहशत आणि भीती निर्माण करण्यासाठी, तसेच आम्हाला बदनाम करण्यासाठी 100 कोटी शौचालय घोटाळ्याचे खोटे आरोप केले असं मेधा सोमय्या म्हणाल्या आहेत. संजय राऊत यांच्या विरोधात मेधा सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. मेधा सोमय्या (Medha Somaiya) या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी आहेत. भारतीय दंड संहिता कलम 499 व 500 च्या अंतर्गत संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी विनंती शिवडी येथील मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट 25 नं. न्यायालय येथे मेधा सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान न्यायालयाने याबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे. तसेच मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे, यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया प्रारंभ झाला असून पुढची सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. ऍड विवेकानंद गुप्ता, ऍड लक्ष्मण कनाल, ऍड अनिल गलगली यांनी सोमय्या यांची बाजू मांडली.


 






आम्हाला घाबरवण्यासाठी घोटाळ्याचे आरोप, सोमय्यांनी शिवसेनेला धरलं धारेवर


संजय राऊतांबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांनी आम्हाला घाबरवण्यासाठी घोटाळ्याचे आरोप केले. याविरोधात आज आम्ही मानहानीची याचिका दाखल केली आहे. मेधा सोमय्या यांची याचिका कोर्टाने दाखल करून घेतली आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून 26 मे रोजी पुढची सुनावणी होणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.


प्रकरण नेमकं काय आहे?


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी आरोप केल्यानुसार, किरीट सोमय्या यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचं म्हटलंय. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाला आहे असं राऊत म्हणाले होते. तसेच ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पाहा. विक्रांतपासून ते शौचालयापर्यंत असा टोला राऊत यांनी लगावला होता. किरीट सोमय्या आणि त्यांचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळ्याची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल असं राऊत म्हणाले होते.