Barsu Refinery : लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election 2024) पार्श्वभूमीवर बारसू रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे महाविकास आघाडीला इशारा देण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बारसू रिफायनरी विरोधी भूमिका मांडावी आणि तो अजेंडा महाविकास आघाडीचा असावा, अशी मागणी बारसु रिफायनरी विरोधी संघटनेने केली आहे.
...अन्यथा बारसू रिफायनरी विरोधी संघटना आपला उमेदवार उतरवणार
जो पक्ष बारसू रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकीत ठेवेल, ज्यांच्या जाहीरनामांमध्ये त्यांची या संदर्भातील भूमिका स्पष्ट असेल, त्यांनाच गावकरी आणि संघटना पाठिंबा देईल, असं संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अन्यथा बारसू रिफायनरी विरोधी संघटना आपला उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उभा करणार आहे, तशी तयारी संघटनेकडून दर्शवली गेली आहे.
महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली
महाविकास आघाडीतील नेत्यांनी या सगळ्या मुद्द्यावर आपण गावकऱ्यांसोबत आहोत जनतेसोबत आहोत असं सांगत बारसू रिफायनरी विरोधात आपली भूमिका मांडली. मात्र प्रत्यक्षात जाहीरनाम्यात ही भूमिका असावी अशी मागणी आता संघटनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा त्या पक्षाला मतं दिली जाणार नाहीत. असं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय. बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी महाविकास आघाडीतील या संदर्भात सर्व महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली असून याबाबतची आपली भूमिका मांडली असल्याची माहिती आहे.
नेमका वाद काय?
कोकणातील राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द केल्याच्या अधिसूचनेनंतर आता बारसूतील सोलगाव परिसरात ती 'क्रूड ऑइल रिफायनिंग' कंपनी प्रस्तावित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील 'आरामको' या सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणाऱ्या कंपनीसोबत केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे 13 हजार एकर जागेवर प्रस्तावित आहे. 30 जून 2021 रोजी बारसु -सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. बारसू आणि सोलगांव या दोन गावांपैकी सोलगाव या ग्रामपंचायतीनं एमआयडीसी आणि रिफायनरीला विरोध असल्याचा ठराव केला आहे. 28 जून 2021 रोजी याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. तर, शिवणे खुर्द या गावानं देखील रिफायनरी आणि एमआयडीसी प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव केला आहे. या नव्या जागेमध्ये राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे खुर्द आणि धाऊलवल्ली या गावांमधील सडा अर्थात जमीन जाणार आहे. त्यामुळे सध्या आता याबाबत देखील विरोध होत असल्याचं दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या>>>
मोठी बातमी! हिंगोलीतील टोकाई सहकारी साखर कारखाना विक्रीला, भाजप नेत्याला दणका!