Maharashtra Political Crisis : राज्यातले राजकारण दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक होताना दिसत आहे. एकीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसही यात सक्रिय होताना दिसत आहे. शिंदेंसह त्यांच्या गटाचे वास्तव्य असलेल्या गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलबाहेर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी टेहळणी करताना दिसून आले आहेत. विशेष म्हणजे हे दोनही पदाधिकारी खासदार सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोण आहेत ते 2 पदाधिकारी?


गुवाहाटीतल्या आमदारांवर राष्ट्रवादीची नजर ? 


शिवसेनेत (Shiv sena ) सुरुंग लावून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सत्तेला हादरा देणारे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण देशातील सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता आली आहे. त्यामुळे देशाच्या नजरा महाराष्ट्रावर आहेत. आसामची राजधानी गुवाहाटी हा सध्या देशभर चर्चेचा विषय आहे. ईशान्येचे हे राज्य महाराष्ट्राच्या राजकारणाचे आखाडा झाले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये ठाण मांडून आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसही यात सक्रिय होताना दिसत आहे. शिंदेंसह त्यांच्या गटाचे वास्तव्य असलेल्या गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलबाहेर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी टेहळणी करताना दिसून आले आहेत. विशेष म्हणजे हे दोनही पदाधिकारी खासदार सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. 


हॉटेलबाहेर टेहळणी करणारे ते पदाधिकारी कोण? सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख


गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलबाहेर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी टेहळणी करताना दिसून आले आहेत. त्यापैकी कुशल करंजावणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव आहेत तर सुहास उभे हे राज्य समन्वयक आहेत. हे दोघेही आज गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू दिसून आले आहेत. त्यामुळे आता या दोघांना पक्षाने काही विशेष जबाबदारी सोपवली आहे का  असा प्रश्न निर्माण होत आहे. 


शिवसेनेत मोठी फूट


राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत 45 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. याच दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे आमदार आहेत ते त्यांची साथ सोडून हळूहळू शिंदे यांना जाऊन मिळत आहेत. अशातच शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात त्यांना यश येताना दिसत नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर आमदारांना पुन्हा परतण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता. मात्र बंडखोर आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यातच आता बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी स्वतः शिवसेना कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. 


16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस, सोमवारपर्यंत वेळ
बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं असून त्यांनी मत मांडलं नाही तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे.  त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. उद्यापासून सर्वांना नोटिसा जातील आणि त्यांना सोमवार पर्यंत वेळ देण्यात येईल, यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. या बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं का नाही ते आता उद्धव ठाकरे ठरवतील असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही, त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. मग ते कट्टर शिवसैनिक आहेत ही जी काही डॉयलॉगबाजी ते करत होते ती बंद होईल असंही अरविंद सावंत म्हणाले.