Kirit Somaiya On Shivsena : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. अशातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या काही समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून शिवसेनेत खळबळ उडाली आहे, यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट करत मोठा दावा केला आहे. सोमय्या यांच्या ट्वीटवरून वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाले किरीट सोमय्या?
उद्धव ठाकरेंचे आता काऊंटडाऊन सुरू झाले
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा दावा केला असून, उद्धव ठाकरेंचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला (माफिया सेना) 52 मते मिळाली आहेत. 12 आमदारांचे बंड (55 शिवसेना + 9 समर्थक = 64) उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचे काउंट डाऊन सुरू झाले आहे.
शिवसेनेत फूट? एकनाथ शिंदे 11 आमदारांसह सूरतमध्ये
शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे 11 आमदारांसह सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी रात्री उशिरा भाजपच्या एका नेत्यासोबत बैठक घेतली असल्याचे म्हटले जात आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप; देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
राज्यातील विधान परिषद निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. सोमवारी रात्रीपासून शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर गेले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 12 आमदार असल्याची माहिती समोर आली होती. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि इतर अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. सूरतमधील हॉटेलमध्ये 25 आमदार असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेण्याची दाट शक्यता आहे.