Ajit Pawar : देशात एकीकडे महागाई (Inflation) वाढताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. यावर राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केलं आहे. दरम्यान राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लागणार का? याबाबत अजित पवार यांनी नेमके काय सांगितले? यासोबतच राज्यात घडत असलेल्या सध्याच्या घडामोडींवर भाष्य करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली तर निर्बध लागू शकतात तसे टास्क फोर्स शी बोलून निर्णय घेऊ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यावर काही दिवसात कोरोनाचे संकट आले, आपण सर्वांनी शर्थीने या संकटावर मात केली. कोरोनाचे संकट कमी झालं असलं तरी अजून ते संपलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध जरी हटवले असले तरी सर्वांनी स्वच्छेने मास्क वापरला पाहिजे
यामागील मास्टर माईंड पोलिस शोधतील - अजित पवार
राज्यात सध्या ठिकठिकाणी शस्त्रसाठा सापडत आहे, या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे. यावर अजित पवार म्हणाले, राज्यात पोलिस दल सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवून आहे. तलवारीचा साठा सापडला, त्यावर पोलिस जप्तीची कारवाई करत आहेत. यामागील मास्टर माईंड कोण हे पोलिस शोधतील. जातीय सलोखा ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तेढ निर्माण होईल असं कोणी बोलू नये असं आवाहन करतो.
बुस्टर डोस हे नाव तुम्हीच पाडलंय
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाच्या सभा आहेत. यावर काल आशिष शेलार यांनी फडणवीसांच्या होणाऱ्या सभेबाबत माहिती देत महाविकास आघाडीला बूस्टर डोस देणार असल्याचं म्हटंल होतं. त्यावर अजित पवार म्हणाले, बुस्टर डोस हे नाव तुम्हीच पाडलंय. सभांना परवानगी लागते. औरंगाबाद सभेला अटींसह परवानगी दिली आहे. जातीय धार्मिक सलोखा आपल्याला कायम ठेवायचा आहे असेही अजित पवार म्हणाले.
उष्णतेची लाट कायम, काळजी घ्या
महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे. 2-3 दिवस ती कायम राहील, दुपारी उन्हात जायचं असेल तर छत्री वापरा
तुम्ही उलट आमचं कौतुक केलं पाहिजे
अजित पवार म्हणतात, आमची गाडी किती पळावी हे पायलटवर अवलंबून असतं. मी नियम मोडू नका असं सांगत असतो. तुम्ही उलट आमचं कौतुक केलं पाहिजे. माझ्या गाडीवर असलेला 24-25 हजार दंड मी ताबडतोब भरला आहे.
बारामतीत लायन किंवा टायगर सफारी करण्याचा विचार
अजित पवार म्हणाले, बारामतीत लायन किंवा टायगर सफारी करण्याचा विचार करत आहोत. लांडगे बघायला कोण येईल? कोल्हे बघायला येतील. बारामतीत बिबट्या सफारी होईल असं मी म्हटलो नाही. प्रांत आणि संबंधित अधिकारी यांना पाणी टंचाई यावर पाणी पुरवठ्याचे आदेश दिले.
याची खंत कायम राहणार
अजित पवार म्हणाले, बेळगाव अद्याप महाराष्ट्रात येऊ शकलं नाहीय, याची खंत कायम राहणार आहे, मात्र ही गाव जोपर्यंत महाराष्ट्रात येणार नाही तोपर्यंत या गावांना पाठींबा असणार आहे