Eknath Shinde : शिवसेनेचे निष्ठावंत नेते, ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या 'बंडाळी'मुळे राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे एकनाथ शिंदे पक्षावर, नेतृत्वावर नाराज का झाले, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 


एकनाथ शिंदे यांची नाराजी महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून सुरू झाली असल्याची चर्चा आहे. राज्यात भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. शिवसेनेसोबत असलेली निष्ठा आणि पक्षातील स्थान यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, त्याच वेळी उद्धव ठाकरे यांच्या हाती राज्याची धुरा गेली. मात्र, एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचे खाते देण्यात आले. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी डावलण्यात आल्याची सल त्यांच्या मनात होती. 


महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत खाती वाटपात महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली. ही खाती जनतेशी थेट संबंधित असल्याने पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचा त्यांचा मुद्दा होता. सरकारमध्ये शिवसेनेवर राष्ट्रवादीचा प्रभाव वाढत होता. 


राज्य सरकारमध्ये नगरविकासह महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना मनासारखं काम करू दिले जात नसल्याचे म्हटले जात होते. मंत्री म्हणून एखाद्या फाईलवर सही करण्याआधी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनांची प्रतिक्षा करावी लागत होती, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यामुळेही शिंदे नाराज होते.  


निधी वाटपावरूनही एकनाथ शिंदे नाराज होते. शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याने कामे पूर्ण होत नव्हती. त्याच्या परिणामी लोकांचा रोष वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.


शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्षात काही बदल करण्यात येत होते. या संघटनात्मक बदलात एकनाथ शिंदे यांना डावलण्यात येत असल्याचे म्हटले जात होते. काही महत्त्वाच्या निवडणुकांमध्येही शिंदे यांना फारशी जबाबदारी देण्यात आली नव्हती. कधीकाळी शिवसेनेचे 'मॅनेजमेंट' सांभाळणारे एकनाथ शिंदे यांना निवडणूक रणनितीत मागे सारण्यात आल्याने ते दुखावले असल्याचे म्हटले जाते. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत युवा सेनेचा हस्तक्षेप सुरू असल्याची चर्चा सुरू होती. त्याशिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सर्व स्ट्रॅटेजी केल्यामुळे राज्यसभेत पराभव झाला, त्यावेळी कुठे चुकलो हे एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुखांना सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. 


मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचा चांगला संवाद होता. या संवादांमुळेच एकनाथ शिंदे हे ठाकरे यांच्या मर्जीतले समजले जायचे. मात्र, मागील काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यसोबत संवाद कमी झाला होता. त्यातच शिवसेनेतील इतर नेते उद्धव यांचे खास नेते होऊ लागल्याने एकनाथ शिंदे यांच्या नाराजीत भर पडली असल्याची चर्चा आहे. 


आदित्य ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर युवा सेनेचे महत्त्व वाढू लागले. आदित्य यांचे मावसभाऊ आणि युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांचे महत्त्व वाढू लागले होते. वरुण सररदेसाई यांचा सरकारी कारभारात हस्तक्षेप होत असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणखीच दुखावले गेले. 


शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधातही त्यांची नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असले तरी त्यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेला फायदा होण्याऐवजी अडचण होत असल्याचे शिंदे यांचे म्हणणे होते. संजय राऊत हे शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अधिक बाजू मांडतात अशी शिंदे यांची तक्रार असल्याचे एका नेत्याने म्हटले.