Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आणखी एक ट्विट केलंय. "मविआचा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच लढतोय, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरूंग लावलाय. शिंदे सध्या आसाममधील गुवाहाटी येथे आहेत. आपल्यासोबत जवळपास 50 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पावित्र्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. या सर्वांच्या आरोपांना आणि टिकांना एकनाथ शिंदे ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देत आहेत. "मविआचा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसैनिकांना सोडवण्यासाठी लढतोय" असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी नुकतंच केलय.
"प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित.... आपला एकनाथ संभाजी शिंदे." आपल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी असं म्हटंलय.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध ठिकाणी आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी हल्ला करत तोडफोड केली आहे. तर काही ठिकाणी बंडखोर आमदारांच्या फोटोंना काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण चांगलचं तापलयं.
दरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावत सोमवार सायंकाळपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. अशा अनेक घटणा आज दिवसभर घडल्या आहेत.