Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालपासूनच राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेत वादळ उठलं.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलंय की, "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.."
संजय राऊतांच्या ट्वीटनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा बरखास्तीची दोन कारणं आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, किंवा सत्ताधारी पक्षावर अविश्वासाचा ठराव आणवा आणि सत्ताधारी तो अविश्वासाचा ठराव जिंकू शकले नाही, तर विधानसभा बरखास्त होऊ शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेलं ट्वीट अत्यंत बोलकं आहे. त्यांच्या ट्वीटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या ट्वीटमुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे, असं भाष्य केलं होतं. त्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी विधान बरखास्तीचं ट्वीट केलं आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काहीव आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.
शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "राज्यपालांना करोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत पाहूयात. उगाच जास्त उतावीळपणा नको. एकनाथ शिंदे आणि आमचे सर्व लोक पुन्हा स्वगृही परततील याची आम्हाला खात्री आहे." आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. पुढे बोलताना "शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे." असं संजय राऊत यावेळी म्हणाले.