Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. तसेच त्यांना शिवसेनेतील आमदारांच्या मोठ्या गटानं पाठिंबा दिला आहे. सध्या शिंदे गट आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आहेत. त्यातील एक म्हणजे, हा उद्धव ठाकरेंचाच प्लान असून त्यांनीच आमदारांना बंड करण्यास सांगितलं आहे. तसेच, शिंदे गटाकडे एकापाठोपाठ एक आमदारांचं जाणं हाही त्याचाच भाग आहे. एबीपी माझाशी एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन बातचित केली असता, त्यांना यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं. 


सध्याची सुरु असलेल्या राजकीय पेचावर मोठी चर्चा आहे की, ही एकच शिवसेना आहे. हा उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक आहे. त्यांनीच एक मोठा गट तुमच्याकडे पाठवला आहे? याबाबत बोलतााना शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, "मला याबाबत काही माहीत नाही." 


...पण लोकशाहीत शेवटी आकडे महत्त्वाचे; शरद पवारांच्या वक्तव्यावर शिंदेंची प्रतिक्रिया


शरद पवारांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल, असं म्हटलं, त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण लोकशाहीत शेवटी आकडे महत्त्वाचे असतात. लोकशाहीत कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे जे आहे, तेच करावं लागतं. त्यामुळे मला याबद्दल जास्त बोलायची गरज नाही. नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आमची बाजू भक्कम आहे."


दरम्यान, बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा पूर्ण झाला आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय. मात्र अद्याप सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय झालेला नाही. आज बैठक होईल, त्या बैठकीत आम्ही सर्व मुद्द्यावर चर्चा करु आणि योग्य तो निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही एक्स्क्लुझिव्ह माहिती दिली. 12 आमदारांना अपात्र ठेवण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला देखील एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. तसंच आकडे महत्त्वाचे असतात, असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या प्रतिक्रियेला देखील उत्तर दिलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :