Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याची तयारी मागील 6 महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे यांच्या भाजप नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती, अशी देखील माहिती आहे. इंटेलिजन्सचां रिपोर्ट मिळून देखील मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून 'एबीपी माझा'ला मिळाली आहे. 


काल अशी देखील माहिती समोर आली होती की,  एकनाथ शिंदेंच्या बंडाळी प्रकरणी शरद पवार Intelligence Department वर नाराज आहेत. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती काल समोर आली होती. 


राज्य गुप्तचर विभागानेही दिली होती माहिती


काल अशी देखील माहिती समोर आली होती की, राज्य गुप्तचर विभागाने अर्थात एसआयडीने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच सरकारला दिली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी केला होता. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. 


राज्यातील संभाव्य घडामोडींवर लक्ष ठेवणे, राजकीय घडामोडी आणि हालचाली, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायाबद्दल आगाऊ सूचना देणे हे एसआयडीचं काम आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाची स्थापना केली. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार राजकीय घडामोडींची माहिती अनेकदा सरकारला तोंडी दिली जाते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा अंदाज घेण्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरलं आहे.


एसआयडीने देखील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत एसआयडीच्या मदतीने काहीतरी पावलं उचलायला हवी होती. अनेक वेळा राजकारण्यांचे विशेष सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलीस अधिकार्‍यांकडून राज्य पोलिसांना गुप्तचर माहिती देखील मिळते, असं सूत्रांनी सांगितलं.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्र्यांची भावनिक साद, शिंदे मात्र ठाम; राज्यात सत्ता पेच, दोन दिवसांत काय-काय घडलं?


राजकीय संकट घोंघावतंय...SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पना