Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळे वळण लागत आहे. एकीकडे शिवसेनेतील आमदार गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. मात्र, त्याचवेळी पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख माघारी परतले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तर दुसरीकडे आमदार नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरील सही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे या वादाला आता नवे वळण लागणार आहे.
ती स्वाक्षरी माझी नाही, बोगस आहे - आमदार नितीन देशमुख
शिवसेना नेते व आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे, त्यांना राज्य सरकार अस्थिर करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. आपली स्वाक्षरी इंग्रजीत असून त्या पत्रावर बोगस स्वाक्षरी असल्याचा आरोपही त्यांनी केला. नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरीलसही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेच्या गॅझेटियरमध्ये आमदार नितीन देशमुखांचं नाव 'नितिन भिकनराव टाले' असं आहे. या पत्रावरील देशमुखांची सही 'नितीन देशमुख' अशी मराठीत असल्याचं दिसत आहे. त्यांना नितीन देशमुख या नावानं ओळखलं जातं.
भाजपचे एकनाथ शिंदेंना हाताशी धरून षडयंत्र - नितीन देशमुख
आमदार देशमुख यांनी अकोल्यात परतल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, 'राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे. भाजपमध्ये धमक असेल, तर निवडणुका लावाव्या व जनतेसमोर जावे. आता निवडणूक व्हावी, अशी माझी इच्छा आहे. जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देतील. मी सच्चा शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे'. गटनेत्यांनी बैठक बोलावली म्हणून मी आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह एकनाथ शिंदेंकडे गेलो. आम्हाला माहित नसताना गुजरातकडे नेलं जात होतं. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील पळालेत. गुजरातच्या हॉटेलला छावणीचं रुप आले होते. 250 ते 300 पोलिसांचा ताफा होता. त्यात आयपीएस अधिकारीही होते. हॉटेलमध्ये भाजपचे नेते होते. मोहित कंबोज, आमदार संजय कुटे होते. भाजपनं एकनाथ शिंदेंना हाताशी धरून षडयंत्र रचल्याची कल्पना आली. पोलिसांसोबत वाद झाले. मी तेथून पळ काढला. आपल्याला पळ काढल्यानंतर एका गाडीत टाकण्यात आलंय. मला काहीच झालेलं नसताना गाडीत टाकण्यात आलंय. दवाखान्यात डॉक्टरनं अटॅक आलेला नसतांनाही तसं सांगण्यात आलं. ठाकरे, शिवसैनिकांचा विचार करून एकनाथ शिंदे व आमदारांनी परत यावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.
जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन दंडात इंजेक्शन टोचलं
याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, "माझी तब्येत टकाटक आहे. तुमच्यासमोर मी चांगल्या परिस्थितीत आणि चांगल्या तब्येतीत उभा आहे. हॉटेलमधून 12 वाजता निघालो. तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. पण 100 ते 200 पोलीस माझ्या मागे होते. कोणत्याही वाहनात मला बसू दिलं जात नव्हतं. तुम्हाला अटॅक आला आहे, उपचार करायचे आहेत असं सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेलं. मला अटॅक आला नव्हता. बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणतं होतं काय होतं मला माहित नाही. माझ्या शरीरावर चुकीचे उपचार करण्याचं षडयंत्र करायचं होतं. मला काही झाले नसताना इंजिक्शन देऊन घातपात करण्याचं षडयंत्र होते.
गुवाहाटीवरून थेट अकोल्यात
अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख काल अकोल्यातील आपल्या घरी पोहचलेत. आमदार देशमुख गुवाहाटीवरून थेट काल अकोल्यात पोहोचलेत. यावेळी सुधीर कॉलनी भागातील त्यांच्या घरी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. रांगोळ्या काढून आणि औक्षण करीत कुटूंबियांनी त्यांचं स्वागत केलंय. दरम्यान, नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी सिव्हील लाईन पोलिसांत आपले पती हरलिल्याची तक्रार केली होती.
महत्वाच्या बातम्या