नवी दिल्ली:  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis)  निकालाची वेळ आता जवळ येत चालली आहे.  पुढचे तीन चार दिवस त्यादृष्टीनं निर्णायक असणार आहेत. त्यात राजकीय वक्तव्यांनी या निकालाचा सस्पेन्स आणखी वाढत चालला आहे.  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जवळ येत चाललाय आणि काही गूढ, सांकेतिक वक्तव्ये वाढू लागली आहेत.


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी त्यांचा हुकमी डायलॉग पुन्हा  "मी पुन्हा येणार" ऐकवला आहे.  कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले  आता विरोधात असताना त्यांचा हा इशारा समजण्यासारखा होता. पण सत्तेत असतानाच ते पुन्हा येणार म्हणत असतील, तर त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा..त्यात हे वक्तव्य सत्तासंघर्षाचा निकाल जवळ येत असताना होतंय. त्यामुळेच पवारांना फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली तर त्यांनीही याचा थेट संबंध कोर्टाच्या निकालाशीच जोडला


 महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पुढचे चार दिवस महत्वाचे आहेत. घटनापीठातले एक न्यायमूर्ती एम आर शाह हे 15 मे रोजी निवृत्त होतायत. 15 मे रोजी सोमवार आहे. शेवटच्या दिवशी शक्यतो न्यायमूर्ती समारंभी कामकाज करतात. 13 मे, 14 मे रोजी शनिवार, रविवार आहे. त्यामुळे निकाल येणार असेल तर 11 किंवा 12 मे रोजी येण्याची शक्यता अधिक आहे. 


ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे, त्याच घटनापीठाचे दोन निकाल सध्या प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली केंद्र सरकारमधल्या अधिकाराबाबत...दिल्लीचं प्रकरण तर आपल्याआधी 17 जानेवारी रोजीच निकालासाठी राखून ठेवलं आहे. तर सत्तासंघर्षाचं प्रकरण 16 मार्च रोजी राखून ठेवलं आहे. त्यामुळे दोन्ही निकाल एकाच दिवशी येतात की एक आधी आणि एक नंतर हेही पाहणं महत्वाचं असेल. 


 राज्यात गेल्या महिनाभरात अनेक घडामोडी घडत आहेत.   प्रत्येक घटनेमागे सुप्रीम कोर्टाच्या संभाव्य निकालाची पार्श्वभूमी आहे. ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुख्य मुद्दा कोर्टासमोर आहे, त्या 16 पैकी एक आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...त्यामुळे नेमकं काय होणार याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. 
 
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल असेल. शिवसेनेतली फूट घटनात्मकदृष्ट्या वैध की अवैध? मुख्यमंत्र्यांसह त्यांचे 16 सहकारी अपात्रतेच्या कारवाईपासून वाचणार की नाही? सरकारला धोका आहे की नाही या प्रश्नांची उत्तरं या निकालात मिळणार आहेत. त्यामुळे हा निकाल आता नेमका कधी लागतो याची उत्सुकता आहे..तोपर्यंत राजकीय नेत्यांची वक्तव्य मात्र हा सस्पेन्स वाढवत चालली आहेत.


हे ही वाचा :


Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाच्या निकालासाठी उरले फक्त पाच दिवस, 'या' तारखा सर्वाधिक महत्त्वाच्या