Crime News: राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तरुणी बेपत्ता (Missing) होण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कारण मार्च महिन्यात तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. विशेष म्हणजे बेपत्ता तरुणींमध्ये सर्वाधिक 18 ते 20 या वयोगटातील मुलींचा समावेश आहे. तर जानेवारी महिन्यात 1600 आणि फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली बेपत्ता झाल्या असल्याची नोंद झाली आहे. 


बेपत्ता झालेली मुलगी जर अल्पवयीन असल्यास पोलीस अशावेळी अपहरणाची नोंद करतात.  तसेच मुलगी अल्पवयीन असल्याने तिची ओळख जाहीर होणार नाही या हेतून पोलिसांच्या संकेतस्थळावर याची स्वतंत्र नोंद केली जात नाही. परंतु सज्ञान मुलींच्या बेपत्ता झाल्याची नोंद मात्र पोलिसांच्या संकेतस्थळावर केली जाते. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींची संख्या अधिक असल्याचे देखील समोर आले आहे. तर याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रमाण चिंताजनक असून, मिसिंग सेलने याबाबत कारणे शोधून उपाययोजना करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, अहमदनगरमध्ये सर्वाधिक प्रमाण


शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.  ज्यात मार्च महिन्याची आकडेवारी पाहिली असता,  पुणे 228, नाशिक 161, कोल्हापूर जिल्ह्यातून 114, ठाणे 133, अहमदनगरमधून 101, जळगाव 81, सांगली 82, यवतमाळ 74 युवती बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी आकडेवारी हिंगोली 03, सिंधूदुर्ग 03, रत्नागिरी 12, नंदूरबार 14, भंडारा 16  येथून मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 






बेपत्ता झालेल्या मुलींचे प्रमाण (आकडेवारी 2023 ची आहे) 


जानेवारी  : 1600
फेब्रुवारी  : 1810
मार्च        : 2200 


रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया....


दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्यात की, राज्यात दिवसेंदिवस मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याची संख्या वाढते असून, हे चिंताजनक आहे. 2020 पासून महाराष्ट्र हरवलेल्या महिलांच्या बाबतीत नंबर एकवर आहे. आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं वारंवार पाठपुरावा करत आहोत.  नोकरी, लग्न, प्रेमाच आमिष दाखवून मुलींची दिशाभुल केली जात असून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जाताहेत. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यात यावा. तसेच राज्यातील मिसींग सेलचा आढावा घेऊन सूचना द्याव्यात, असे चाकणकर म्हणाल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded : दिसायला चांगली नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण करून केली हत्या; नांदेड जिल्ह्यातील घटना