मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राचे कामकाज उद्यासाठी समाविष्ट नाही. त्यामुळे सुनावणी उद्या होण्याची शक्यता देखील अद्याप दिसत नाही. 


क्वचितच वेळा सप्लिमेंट्री लिस्टमध्ये नसलेल्या गोष्टी कामकाजामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे सुनावणी उद्या होणार नसल्याची वकिलांमध्ये चर्चा आहे. या आधी 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार होती. त्यानंतर ती पुढे जाऊन मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण उद्याही ही सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. 


या आधी राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 4 ऑगस्टला शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर आता चौथ्यांदा ही सुनावणी पुढे गेली आहे. सरन्यायाधीश एस व्ही रमणा (CJI NV Ramana) हे या 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच न्यायमूर्ती उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. या सुनावणीबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने सरन्यायाधीश रमण्णा यांच्या कारकीर्दीत याचा निकाल लागेल ही आशा आता मावळत चालली आहे. 


निवडणूक आयोगाचीही 23 ऑगस्टपर्यंत मुदत


शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावरही दावा केला आहे. शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु झाली आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटानं चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगानं दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. याची मुदत उद्या, 23 ऑगस्ट ही आहे. 


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवणं, खरी शिवसेना कोणाची, तसंच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत अशा मुद्दांवर सुनावणी होईल. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशभराचं लक्ष लागलं आहे. हे यापूर्वी तीन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे.


काय अपेक्षित आहे सुनावणीत?


सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत, निवृत्तीआधी ते हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवतात का? हे अद्याप स्पष्ट नाही.
प्रकरण घटनापीठाकडे गेले तर ते अधिक काळ लांबेल याचीही शक्यता.
काही मुद्द्यांवर घटनापीठाकडे हे प्रकरण जाईल, पण काही मुद्द्यांवर कोर्ट आपला निकाल देतं का याचीही उत्सुकता असेल.
विशेषत: अपात्रतेसंदर्भातल्या कारवाईबाबत आता अजून किती काळ स्थगिती राहते हे पाहणं महत्वाचं असेल.